Breaking

शनिवार, १ जानेवारी, २०२२

*घोडावत कन्या कॉलेजमध्ये व्याख्यान संपन्न ; शेतकऱ्यांच्या हितार्थ-सन्मानार्थ विचार करणाऱ्या सक्षम व्यवस्थेची गरज : प्रा.डॉ.प्रभाकर माने*

 

 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते डॉ. प्रभाकर माने

*प्रा. चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी*


         गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूर मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास जयसिंगपूर कॉलेजचे  प्रा.डॉ. प्रभाकर माने प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.डी.जी. कर्णिक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख  प्रा.भिलवडे होते.

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन

     अर्थशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने व समस्या या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.संदीप रावळ यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उदात्त हेतू स्पष्ट केला. प्रास्ताविकात ते म्हणाले, एकविसाव्या शतकामध्ये भारतीय शेतीसमोर प्रचंड आव्हाने असून यावर उचित मार्गदर्शन व्हावे तसेच ३ कृषी कायद्यांचा सत्यता समजावी यासाठी आयोजनाचा हेतू होता.

   यानंतर भारतीय शेतीची वास्तवता :  शेतीसमोरील आव्हाने व समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर माने म्हणाले, बळीराजा हा खऱ्या अर्थाने देशाचा पोशिंदा असून त्याचा अस्तित्व टिकणे म्हणजे समस्त भारतीयांचे अस्तित्व राहण्यासारखे आहे. यासाठी त्यांनी भारतीय शेतीची वास्तवता समोर मांडून शेतीसमोरील आव्हाने या बाबत विवेचन करताना उत्पादकतेत वाढ करणे, चिरंतन विकास, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे, बाजारपेठेची उपलब्धता, जलसिंचनाची सोय, नैसर्गिक आपत्ती वर नियंत्रण, शेतीचे लहानधारण क्षेत्र, कर्ज व्यवस्था, शासनाची उदासीनता, नव्या पिकांचं संशोधन व कृषी व्यवस्थेची दशा आणि दिशा यावर सांगोपांग मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी शासनाच्या ३ कृषी विधेयक व धोरणांचा खरपूस समाचार घेत याबाबत सत्यता मांडली. एकूणच त्यांच्या या व्याख्यानात आजतागायत प्रत्येक सरकारची भूमिका व कृती ही सुलतानी असून दुसऱ्या बाजूला अस्मानी संकटाने शेतकऱ्याला हतबल केले आहे.

        अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. भिलवडे हे याप्रसंगी मनोगतात म्हणाले, अर्थशास्त्र विषयाचा अभ्यास अनेक बाजूनी करावा लागतो त्याशिवाय अर्थशास्त्र विषयाच्या ज्ञानाची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अर्थशास्त्र विषय अनेक विषयांना स्पर्श करणारा असतो.

     प्राचार्य डॉ.डी.जी.कर्णिक हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, अर्थशास्त्र व भूगोल एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भारतीय अर्थव्यवस्था  अर्थात कृषी अर्थशास्त्राचे समग्र विवेचन करताना भौगोलिक माहितीचा आधार घ्यावा लागतो. त्याचबरोबर समाजाने बळीराजाला सक्षम करण्यासाठी शेतकरी धार्जिन पक्षाला सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.

    या  कार्यक्रमाचे सुंदर आभार डॉ.सौ शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा.रोहिणी पाटील व इतर प्राध्यापक बंधू उपस्थित होते. या व्याख्यानासाठी विद्यार्थिनींची संख्या प्रशंसनीय होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा