Breaking

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार ; पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ नोव्हेंबर


संचालक, प्रा.डॉ. अजितसिंह जाधव, परीक्षा व मूल्यमापन मंडळ,


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठ परीक्षा बाबत अंतिम निर्णय घेतला असून यानुसार विद्यापीठ परीक्षा १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.अजितसिंह जाधव यांनी दिली आहे.

      असंख्य विषयांचा अभ्यासक्रम अपूर्ण असल्याने आणि विधानसभा निवडणुक कामी सुमारे २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने शिवाजी विद्यापीठाने हिवाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यानुसार विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ ऑक्टोबरपासून घेण्याची तयारी विद्यापीठाने केली होती. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणानुसार बदललेला पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याचे विद्यापीठाच्या लक्षात आले. अशा स्थितीत परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने हिवाळी सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 

       शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा १२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या परीक्षा होतील. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी, अशा जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा २५ नोव्हेंबरपासून घेतल्या जाणार आहेत. दरम्यान, या परीक्षांचे वेळापत्रक चार दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षांची तयारी वेगाने सुरू असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.


*विशेष सूचना व माहितीस्तव*

     आरपीई परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.विद्यापीठातर्फे नोव्हेंबरमध्ये आरपीई (रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स) कोर्स वर्कची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय अथवा अधिविभागात अर्ज सादर करावयाचे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा