Breaking

सोमवार, १४ जून, २०२१

"या मराठी माणसामुळे मिळते रविवारची सुट्टी"




नारायण मेघाजी लोखंडे

नवी दिल्ली:  रविवार म्हणजेच सुट्टीचा दिवस असतो.संपूर्ण आठवडाभर काम केल्यानंतर या  दिवशी लोक आराम करतात. आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवतात आणि सोबतच पुढचा आठवडाभर काम करण्यासाठी स्वतःला तयार करतात. संपूर्ण आठवडाभर लोक या एका दिवसाची वाट पाहात असतात. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का, की भारतात रविवारच्या सुट्टीची सुरुवात कधी झाली? आणि ही सुरुवात कोणी केली. यामागचा इतिहास नेमका काय आहे?

        सर्वात आधी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, की या घटनेचा इतिहास अत्यंत दुःखद आहे. यामागे अनेक लोकांचा संघर्ष आणि लढाई आहे. आज ज्यादिवशी आपण आपल्या घरामध्ये बसून आराम करतो याचं श्रेय नारायण मेघाजी लोखंडे यांना जातं. आपल्याला माहिती आहे, की भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. यावेळी लोकांवर प्रचंड अत्याचार केले जात असत. इंग्रजांच्या काळात कामगारांना आठवड्यातील सातही दिवस विना सुट्टी काम करावं लागत होतं.

       नारायण मेघाजी लोखंडे त्यावेळी कामगारांचे नेते होते. कामगारांची अवस्था पाहून त्यांनी याबाबत ब्रिटीशांजवळ आपली बाजू मांडली. यासोबतच आठवड्यात एक दिवस सुट्टी देण्याची परवानगीही मागितली. मात्र, ब्रिटीश सरकारनं त्यांची ही मागणी फेटाळून लावली. लोखंडे यांनी ही गोष्ट अजिबातही आवडली नाही. त्यांनी कामगारांसोबत मिळून या गोष्टीचा विरोध केला. त्यांनी सरकारच्या या सक्तीविरोधात आवाज उठवला. विरोध प्रदर्शन केलं गेलं.

         हे सगळं वाटतंय तितकं सोपं नव्हतं. त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी अनेक प्रयत्न केले आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळालं. जवळपास सात वर्षांनंतर इंग्रज सरकारनं 10 जून 1890 मध्ये आदेश जारी केला. या आदेश जारी झाल्यानंतर आठवड्यातील एक दिवस म्हणजेच रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच दररोज दुपारी अर्धा तास विश्रांतीसाठी देण्यात आला. याचाच अर्थ रविवारच्या सुट्टीसोबत आज आपण ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी काम करताना जो ब्रेक घेतो तोदेखील याच महान व्यक्तीची देण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा