*डॉ. महावीर ज. बुरसे*
mahavira99@gmail.com
📱7588577637
परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे हे आपण पूर्वीपासून शिकत आलो आहोत. या परिवर्तना बरोबर जे आपल्यामध्ये बदल करतात तेच या परिवर्तनाच्या चक्रामध्ये यशस्वी होतात. मात्र या परिवर्तनामध्ये आवश्यक उपलब्ध साधने व परिवर्तन स्वीकारणाऱ्याची मानसिक स्थिती हे घटक सर्वात महत्त्वाचे आहेत.
कोरोना साथीमुळे जगात सर्व पातळीवर बदल घडत असून आर्थिक,राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक बदल होताना आपण पाहत आहोत. यामध्ये शैक्षणिक क्षेत्र याला अपवाद राहिले नसून या आपत्तीमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झालेले दिसून येत आहेत. सध्या या क्षेत्रात एक शब्द सर्रासपणे सर्वत्र वापरला जात आहे तो म्हणजे ‘ऑनलाइन शिक्षण’ होय. शैक्षणिक प्रवाहामध्ये विद्यार्थी हा आधुनिक शिक्षणाचा केंद्रबिंदू मानतो. मात्र या पद्धतीचा उपयोग या विद्यार्थ्यांना होत आहे का ? ऑनलाइन शिक्षण कितपत विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचत आहे ? विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडत आहे का? विद्यार्थ्यांची मानसिकतेचा विचार करता, ते त्यांना कितपत समजते व रुजते याचा अभ्यास होणे महत्त्वाचे वाटले म्हणून प्रश्नावलीच्या माध्यमातून प्राथमिक माहिती एकत्रित करून ऑनलाइन शिक्षणाची सद्यस्थिती यावर हा संशोधनात्मक लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑनलाइन शिक्षणासंदर्भात काही प्रश्न महत्त्वाचे आहेत. यामध्ये शासन-शिक्षण विभाग-महाविद्यालय-शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय असणे महत्वाचे आहे. शासनाने शिक्षण विभाग व शिक्षकांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यास सांगितले मात्र ऑनलाईन शिक्षणासाठी बरेच पर्याय उपलब्ध असल्याने बराच गोंधळ झालेला दिसतो. यासाठी विद्यार्थ्यांच्यासाठी ठराविक एक यूजर फ्रेंडली ॲप्लिकेशन विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अध्ययन-अध्यापन, नोट्स, टेस्ट व उपस्थिति यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर न करता त्याच्या शैक्षणिक स्तरासाठी एकच पर्याय उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ऑनलाइन शिक्षणाची सद्यस्थिती या संशोधनातून आलेला काही निष्कर्ष.
१. अभ्यास क्षेत्रातील ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या 34% विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दररोज तीन तासा पेक्षा जास्त वेळ नसावे असे वाटते तर फक्त 12% विद्यार्थ्यांना पाच तासा पेक्षा जास्त ऑनलाइन शिक्षण असावे असे वाटते.
२. दररोज एका विषयासाठी सर्वसाधारण 45 मिनिटे ते 1 तास एवढा वेळ असावा असे अनुक्रमे 38% व 35% विद्यार्थ्यांना वाटते.
३. ऑनलाईन शिक्षण घेतेवेळी विद्यार्थ्यांना कोणत्या प्रमुख व मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागते याबाबत 90% विद्यार्थी नेटवर्क प्रॉब्लेम व कमी नेटपॅकची उपलब्धता ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते.
४. विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने म्हणजेच महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेण्यास 90% विद्यार्थी रुची दाखवितात. मात्र 10% विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षण प्रभावी मानतात.
५.ऑनलाइन शिक्षणामुळे 66 टक्के विद्यार्थ्यांना डोळ्यांशी संबंधित समस्या जाणवत असल्याचे सांगतात तर 8% विद्यार्थी पाठदुखीचा त्रास होत असल्याचे दिसून येते.
६. ऑनलाइन शिक्षणाबाबत 35 टक्के विद्यार्थी मानतात की, त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे.
शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणारा विद्यार्थ्याचे शारीरिक, मानसिक आरोग्य व आर्थिक परिस्थिती यांचा सर्वकष अभ्यास होणे गरजेचे आहे. तसेच उपरोक्त सारासार विचार करून सर्वसमावेशक अशी ऑनलाइन शिक्षण प्रणाली असावी ज्यामुळे विद्यार्थ्यावर कोणत्याही विपरीत परिणाम न होता तो आशावादी राहून स्वाभाविकपणे माहिती व ज्ञान संपादन करण्यासाठी ते प्रवृत्त झाले पाहिजेत. त्याचबरोबर कोणताही विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शैक्षणिक प्रवाहातून बाहेर फेकला जाऊ नये याची दक्षता ही घ्यावी लागेल. अन्यथा आधुनिक माध्यमे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शाप ठरू नयेत हीच एक अपेक्षा.
Very nice Article
उत्तर द्याहटवा