Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

"उलट्या पायाच्या मुलीच्या जन्माने अंधश्रद्धेपायी व भीतीपोटी आई वडीलाने मुलीस रुग्णालयात सोडून केले पलायन"

 



मुंबई : आपल्याकडे भूताचे पाय उलटे असतात असं मानलं जातं; पण मध्य प्रदेशातील  हरदामध्ये चक्क एका नवजात अर्भकाचे पाय उलटे असल्याचं आढळलं आहे. त्यामुळं घाबरलेल्या आई-वडिलांनी या मुलीला रुग्णालयातच सोडून पळ काढला आहे. या मुलीच्या दोन्ही पायाची बोटं मागच्या दिशेनं आहेत. वैद्यकीय शास्त्रात ही अतिशय दुर्मीळ घटना असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.

    भारतात आजतागायत अशी घटना क्वचितच घडली आहे. खरंतर, यामागे वैद्यकीय कारणे आहेत; मात्र सर्वसामान्य लोकांच्या मनात अंधश्रद्धा, गैरसमज असल्यानं अशा मुलीच्या जन्मामुळे खळबळ माजली आहे. तिच्या आई-वडिलांनीही तिचा त्याग केला आहे. अज्ञान, अंधश्रद्धेपोटी या चिमुकलीला जन्मतःच आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाला वंचित व्हावं लागलं आहे.

     झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील हरदा इथल्या खिरकिया ब्लॉकमधील झांझरी इथं राहणाऱ्या विक्रम नावाच्या व्यक्तीच्या पत्नीनं हरदा जिल्हा रुग्णालयात  सोमवारी दुपारी 12 वाजता एका मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर मुलीचे दोन्ही पाय उलटे असल्याचं निदर्शनास आलं. मुलीचे असे पाय बघून घाबरलेल्या आई-वडिलांनी या नवजात मुलीला रुग्णालयातच टाकून पळ काढला.

    डॉक्टरही आश्चर्यचकित : ही अतिशय दुर्मीळ घटना असल्यानं या मुलीला बघून डॉक्टर आणि परिचारिकादेखील आश्चर्यचकित झाल्या. या बाळाचे वजनदेखील सर्वसामान्य बाळांच्या वजनापेक्षा कमी आहे. सर्वसामान्य बाळाचे जन्मतः वजन साधारण 2.7 किलो ते 3.2 किलो असते. या बाळाचे वजन फक्त 1.6 किलो आहे. या बाळाची सर्वतोपरी काळजी इथले डॉक्टर्स आणि परिचारिका घेत असून, ते सुखरूप आहे.

    या रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. सनी जुनेजा यांनी आपल्या 5 वर्षांच्या कारकीर्दीत आतापर्यंत अशी घटना बघितली नसल्याचं म्हटलं आहे. इंदूर आणि भोपाळमधील बालरोग तज्ज्ञ आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनीदेखील ही एक दुर्मीळ घटना असल्याचं सांगितलं आहे, असं डॉ. जुनेजा यांनी म्हटलं आहे.

     याबाबत बोलताना इंदूरच्या अरबिंदो हॉस्पिटलचे अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. पुष्पवर्धन मंडलेचा म्हणाले, ‘ही एक दुर्मीळ घटना आहे. लाखात एक अशी घटना घडते. आईच्या गर्भाशयात जागा कमी असल्यानं किंवा अनुवंशिकतेनं असे प्रकार घडतात. आजपर्यंत मी असा प्रकार पाहिलेला नाही. मात्र ऑपरेशननंतर पाय सरळ केले जाऊ शकतात.

     वैद्यकीय शास्त्रात या दुर्मीळ व्यंगावर उपचारही आहेत ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळं लवकरच या मुलीचे पाय सरळ होतील आणि तिला आई-वडिलांचे छत्र लाभेल अशी अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा