Breaking

रविवार, १ मे, २०२२

'शब ए कद्र' ची रात्र - पवित्र रमजान महिन्यातील या रात्रीला का आहे एवढं महत्व ? - जाणून घ्या प्रा. अस्मा बेग यांच्या विशेष लेखणीतून

 



      रमजान महिना सुरू होताच मुस्लिम समाजातील लोक उपासनेत तल्लीन होतात. दिवसभर उपवास(रोजा)ठेवणे, कुराण पठण,नमाज पठण आणि इतर सदका, जकात या उदात्त गोष्टींसह तरावीहची प्रार्थना देखील रात्री केली जाते. रमजान च्या या पवित्र महिन्यात मुसलमान दिवस-रात्र प्रार्थना करतात. परंतु या महिन्यात येणारी शब-ए-कद्र या रात्रीस इस्लाम मध्ये अनन्य साधरण महत्व आहें. वास्तविक, इस्लाम धर्मात या रात्रीचे वर्णन हजार रात्रींपेक्षा श्रेष्ठ (अफजल )ठरवण्यात आले आहे. या रात्रीचे महत्व कुराणमध्ये वर्णन केलेले आहे. या रात्री देव स्वतः क्षमा करण्यासाठी पुढे येतो व आपल्या अनुयायांना हाक देतो व क्षमा मागणार्‍यांना क्षमा करतो .धन (रीज्क) मागणाऱ्याना धन (रीज्क) देतो.अशी मान्यता आहें की या रात्रीत केलेल्या माणसाची प्रत्येक वैध(जायज )प्रार्थना मान्य आहे. म्हणूनच, शब-ए-कद्रच्या रात्री लोक रात्रभर प्रार्थना करण्यात मग्न असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने नफिल नमाज पठण, कुराणचे पठण, तस्बीह पठण (जप), अल्लाह चे जिक्र करण्यात मुस्लिम समाज मग्न असतो. या रात्री जास्तीत जास्त नफिल नमाज पठण केले जाते , नफील नमाज म्हणजे जी नमाज अनिवार्य नाही, भक्त आपल्या प्रभूला खुश ठेवण्यासाठी आपल्या इच्छेने ही नमाज पठण करतो.

शब ए कद्र चा अर्थ आणि नामकरण

उर्दू, हिंदी आणि पर्शियन भाषेत शबे ए कद्र या नावाने प्रसिद्ध असणारी ही रात्र मूळ अरबी भाषेतील आहे . इस्लाममधील पवित्र रात्र म्हणजे 'लैलातुल कद्र'.लैल म्हणजे "रात्र" आणि कद्र आणि ताझिम म्हणजे "महान". मान सम्मानांची एक महान रात्र म्हणजे शब ए कद्र असा याचा अर्थ होतो .

रमजानच्या शेवटच्या पांच विषम रात्रींपैकी एक रात्र म्हणजे शब ए-कद्र :

मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मुहम्मद याना त्यांच्या अनुयायांनी ज्यावेळी शब ए कद्र बद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की शब ए कद्र ला रमजानच्या शेवटी दहा दिवस ज्याला आखरी अशरा म्हंटले जाते त्या रात्रींपैकी एका रात्रीत शब ए कद्र आहे .खास करून (विषम संख्या) म्हणजेच 21, 23, 25, 27 आणि 29 हया रात्रीत शब ए कद्र असू शकते . 

शब ए कद्र च्या रात्री अवतरला मुस्लिम धर्मग्रंथ :कुराण

मुस्लिम धर्मात शब-ए-कद्र चे महत्त्व वाढण्याचे अजून एक मोठे कारण म्हणजे याच रात्री अल्लाहने मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण अवतरला . आणि या कारणास्तव या रात्री कुराणचे पठण अगदी मनापासून केले जाते. शब ए-कद्र ही रात्र केलेल्या चुकीच्या कृत्यांची तौबाद्वारे पश्चात्ताप करण्याची आणि केलेल्या पापांची दिलगीर देवाजवळ व्यक्त करण्याची रात्र आहें. या रात्री प्रार्थना करणार्‍यांची मागील सर्व पापे अकीदत आणि विश्वासाने क्षमा केली जातात.

आणि म्हणूनच इस्लाममध्ये मुस्लिम शब-ए-कद्र करतात…..

मुस्लिम धर्मामध्ये अशी मान्यता आहे की , एकूण एक लाख चोवीस हजार प्रेषित (पैगंबर ) होऊन गेले .यामधे सगळ्यात प्रथम हजरत आदम आहेत तर सगळ्यात अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर हे आहेत़ .हजरत आदम ते हजरत महंमद पैगंबर या साखळी मध्ये एकूण एक लाख चोवीस हजार प्रेषित (पैगंबर ) होऊन गेले. मुहंमद पैगंबर शब ए कद्र बद्दल असे म्हणतात की, शब-ए-कदर अल्लाहने फक्त माझ्या मुस्लिम अनुयायांना दिली आहे. आधीच्या प्रेषितांपैकी कोणत्याच प्रेषितांच्या अनुयायांना शब ए कद्र ही रात्र देण्यात आली नाही.आधीच्या प्रेषितच्या उम्मातील लोक दीर्घायुषी होते. ते वर्षानुवर्षे देवाची उपासना करत असत.त्यांच्या तुलनेत आजचे लोक हें अल्पायुषि आहेत़ जेव्हा मुहम्मद पैगंबरच्या साथीदारांनी आधीच्या प्रेषितच्या अनुयायांच्या दीर्घ प्रार्थना बद्दल ऐकलं तेव्हा त्यांना थोडे दुखः झाले .की आपण त्यांच्या उपासनेची बरोबरी नाही करू शकत. यावर पैगंबर मुहम्मद म्हणाले की, त्या लोकांच्या दीर्घायुषाच्या बदल्यात अल्लाहने माझ्या उम्मतला अशी एक रात्र दिली, जी हजारो रात्रींपेक्षा श्रेष्ठ आहे, ज्यामध्ये उपासनेचे पुण्य हजार महिन्याच्या उपासनेपेक्षा जास्त आहे.आणि म्हणून पैगंबर मुहम्मद यांचे सर्व अनुयायी म्हणजे आताचे सर्व मुस्लिम बांधव मोठ्या श्रध्देने हया रात्री उपासना करतात. 

कोरोणा नंतरची शब ए कद्र….

प्रत्येक वर्षी शब ए कद्र साठी सगळे मुस्लिम बांधव मस्जिद मध्ये एकत्र येऊन समूहाने नमाज पठाण आणि उपासना करतात.पण गेल्या दोन वर्षी कोरूना काळामध्ये मशिदी पूर्णपणे बंद असल्यामुळे मुस्लिम अनुयायांनी घरीच राहून ही रात्र साजरी केली. पण यावर्षी सर्व मुस्लिम बांधव उत्साहाने एकत्र येऊन मस्जिद मध्ये शब ए कद्र साजरी करतील .अल्लाह कोरोणा च्या या भयानक विषाणू चा नायनाट करेल आणि पुढील शब ए कद्र साठी मस्जीदी नेहमीच उघड्या होतील अशी आशा करूया.  

    प्रा . आसमा रीज्वान बेग-सौंदलगे देवचंद कॉलेज अर्जुननगर निपाणी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा