सांगली : येथील जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील लिपीकास (clerk) पंचवीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. अरूण योगीनाथ कुशीरे (वय ५७, रा. उरूणवाडी, इस्लामपूर) असे त्याचे नाव आहे. तक्रारदार यांच्या कामाची देयक रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे.
अरूण कुशीरे हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लिपीक म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांनी केलेल्या कामाची देयक रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी कुशीरे याने ३५ हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (anti corruption) तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर कुशीरे याने २५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सकाळी जिल्हा परिषदेत सापळा रचण्यात आला होता.
तक्रारदार यांनी पंचवीस हजार रूपयांची लाच देताना कुशीरे यास रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपतचे अधीक्षक राजेश बनसोडे, अपर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, अविनाश सागर, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, सलीम मकानदार, राधीका माने यांचा कारवाईत सहभाग होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्य उत्पादन शुल्कचा निरीक्षक, कवठेमहांकाळ येथील तलाठी आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेतील लिपीकावर ही कारवाई केली आहे. जिल्ह्यातील ही तिसरी मोठी कारवाई आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा