छाया- समाधान व्होवळे |
कोल्हापूर: पश्चिम घाटातील गगनबावडा हा जैवविविधतेने समृद्ध असा भाग. येथीलच तळये बु. या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या गावालगतच्या वनराईत निसर्गमित्र समाधान व्होवळे व भरत व्होवळे यांना भ्रमंती करत असताना दि.13 जून रोजी दुर्मिळ असा 'श्रीलंकन फ्रॉग माऊथ '(बेडूक मुखी) हा पक्षी दिसून आला. याचे शास्त्रीय नाव - Batrachostomus Moniliger असे आहे. ज्याची अधिक माहिती घेतली असता कोल्हापूर मध्ये या पक्ष्याची नोंद तब्बल बावीस वर्षानंतर घेतली गेली असल्याचे लक्षात आले. त्यांना या पक्ष्याची ओळख तसेच अधिक माहिती मिळवण्याकामी स्वप्नील असोदे व मयुर जाधव यांची मदत मिळाली.
हा पक्षी निशाचर असुन खाद्याच्या शोधात रात्रीचेच बाहेर पडतो व दिवसा घनदाट जंगलात विश्रांती घेतो. साधारणपणे 22 ते 23 सेंटिमीटर लांब असणाऱ्या या पक्ष्याचे कीटक हे प्रमुख खाद्य असते. नर पक्षाचा रंग हा वाळलेल्या लाकडाच्या सालीसारखा राखाडी तर मादी ही बदामी रंगाची असून पाठीवर पांढरे ठिपके असतात. याचे तोंड बेडकाच्या तोंडासारखे दिसत असल्यामुळेच याचे नाव श्रीलंकन फ्रॉग माऊथ म्हणजेच बेडूक मुखी असे म्हणतात.
तब्बल 22 वर्षानंतर नोंद
डॉ.वरद गिरी यांनी राधानगरी वाईल्ड लाईफ सेंच्युरी मधे या पक्ष्याची नोंद 1998 साली केली होती. त्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर हा पक्षी दिसण्यात आल्याची नोंद घेतली गेली आहे.
निसर्गमित्र समाधान व्होवळे व भरत व्होवळे हे आपल्या परिसरातील जैवविवीधतेच्या नोंदी ठेवत असतात. तसेच गावकऱ्यामधे प्रबोधनाचे कामही करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा