प्रा. इम्रान वजीर मणेर
समन्वयक, एकलव्य करिअर अकॅडमी, जयसिंगपूर.
imranmaner@gmail.com
संपर्क- ९९२३२९२३४६
हिंदुस्तानच्या इतिहासात असंख्य महापुरुषांची त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीमुळे त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. पण हिंदुस्थानातील कोल्हापूर संस्थानाचा एक संवेदनशील राजा अर्थात छत्रपती शाहू महाराज होय. स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदूस्थान हा यक्ष प्रश्न व अडचणीला सामोरे जात असताना सरकारचा प्रयत्न मात्र अंधारात रस्ता शोधण्यासारखा होता. परंतु तत्कालीन काळात मोठ्या प्रश्नांपैकी हिंदू मुस्लीम दंगलीचा विषय हा ऐरणीवर होता मात्र या प्रश्नाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करून उलटपक्षी हा प्रश्न कसा वाढेल आणि या माध्यमातून आपली राजकीय, आर्थिक व धार्मिक व्यवस्था कशी टिकून ठेवता येईल यासाठी तत्कालीन घटकाकडून प्रयत्न केले जात होते. ब्रिटिश शासकांना देखील हेच अपेक्षित होते अशावेळी हिंदू-मुस्लिम पहिली दंगल १८९३ मध्ये मुंबईत झाली. याचा गैरफायदा काही धार्मिक द्वेषीनीं घेतला आणि मुसलमानांविरूद्ध विषाची पेरणी सुरू केली आणि मुंबईप्रमाणेच पुण्यातही दंगल घडवून आणली. हिंदू व मुस्लिम समाजात द्वेष आणि अंतर निर्माण करण्यात धर्मद्वेषी यशस्वी ठरले. १८९४ मध्ये, पुण्यातील सार्वजनिक सभेत राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या भाषणात पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींचा उल्लेख केला आणि हिंदु-मुस्लिम समाजांमधील प्रेम व बंधुभाव निर्माण करून समाजात शांतता प्रस्थापित करावी असा उपदेश सार्वजनिक सभेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला.
ही गोष्ट आपल्याला २०२१ मध्ये सामान्य वाटेल परंतु १८९४ मध्ये, छत्रपती शाहू महाराजांनी १२७ वर्षांपूर्वी आपल्या दृष्टीकोनातून दंगलीचे राजकारण आणि त्याचे समाज आणि देशावरील दुष्परिणाम पाहिले होते. समाजातील धर्मद्वेषी येथून पुढे बहुजन समाजाला गुलाम बनवण्यासाठी दंगलीचा वापर करणार, ही बाब त्यांनी नोंद केली होती.
सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्यासाठी हिंदू-मुस्लिम समाजात एकता असणे आवश्यक आहे, हे ते नेहमीच समाजाला समजावून सांगत असत.
राजर्षी शाहू महाराज १९२० च्या भाषणात म्हणतात की, हिंदू आणि मुस्लिम हे एकाच राष्ट्राचे वेगवेगळे भाग आहेत.आज संपूर्ण देश जातीयवादाने त्रस्त आहे, गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजपर्यंत झालेल्या दंगलींचा परिणाम हा सर्वसामन्यावर वाईटच झाला आहे. दंगलीं मध्ये बलात्कार, खून होतात, निष्पाप मुले अनाथ होतात, स्त्रीया विधवा होतात, वृद्ध आई-वडील निराधार होतात, वस्ती-शहरे भस्मसात होतात. यावर नंतर पश्चात्ताप करून काहीही उपयोग होत नाही. असे होऊ नये यासाठी सामुहिक स्तरावर आजपर्यंत काही प्रयत्न केले गेले आहेत का?
राजर्षी शाहू महाराजांना १२७ वर्षांपूर्वी हे जातीय संकट जाणवले होते आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य टिकविण्यासाठी विशेष प्रयत्नही केले होते.
त्या काळात मराठा, लिंगायत, जैन व मुस्लिम हा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला होता. शिक्षणाचा अभाव हे त्याचे मुख्य कारण होते. १९०१ मध्ये शाहू महाराजांनी मराठा व जैन बोर्डिंगची स्थापना केली. तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांना शिक्षणात रस निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आणि त्यासाठी जी कोणती मदत हवी आहे ती देण्याचे आश्वासनही दिले, परंतु मुस्लिम समाजातून कोणी पुढाकार घेतला नाही, तरीही शाहू महाराज गप्प बसले नाहीत. महाराजांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डींगमध्ये १० होतकरू गरजू मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांनी संस्थानामध्ये मुस्लिम बांधवांसाठी शिक्षण सुरू केले. या १० विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी कर्नाटकमधील अथणी गावचा शेख महमद युनूस अब्दुल्ला हा होता.
महमूद युनूस यांनी राजाराम महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना आपल्याच संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. आजच्या मुस्लिम बांधवांनी यावर विचार करावा की आजपासून १२३ वर्षांपूर्वी आपल्या शिक्षणाची चिंता करणारा, स्वतःच्या पैशाने शैक्षणिक संस्था उभारणारा, शिक्षणाची व्यवस्था करणारा आणि त्यानंतर आपल्याच संस्थेत मामलेदारपदावर नोकरी देणारा नेक दिल नेता राजर्षी शाहू महाराज यांना आपणाबद्दल किती सहानुभूती होती. आज जर आपण मुस्लिम समाजासाठी मुस्लिम नेत्यांनी केलेल्या कार्याचे वर्णन केले तर स्मशानभूमीची सीमा भिंत, मुशायरा, काव्वालीचे आयोजन, क्रिकेट सामने, फुटबॉल सामने बस्स इतकंच...?
मी असा एक मुस्लिम नेता शोधतोय की जो मुस्लिमांचे शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक विकास, दारिद्र्य, बेकारी व विषमता या प्रश्नांवर चिंतीत आहे व या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मला वाटते, राजर्षी शाहू महाराजांनंतर असा प्रयत्न कोणी मुस्लिम नेत्यांनी केला नाही.
आश्चर्याची बाब म्हणजे आजही इक्रा बिस्मी रब्बी कल्लजी खल्क (पढ़ अपने रब के नाम से) अशी म्हणणारी पिढी आजही शिक्षणाचे महत्त्व समजुन घेत नाही. १९०६ मध्ये शाहू महाराजांनी प्रतिष्ठित मुस्लिम लोकांची बैठक घेतली आणि मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्याअंतर्गत मुस्लिम बोर्डिंग सुरू केले. खास बाब म्हणजे शाहू महाराज स्वत: या बोर्डिंगचे अध्यक्ष झाले आणि युसूफ अब्दुल्ला हे कार्यवाह बनविले.
मुस्लिम बोर्डिंगसाठी शाहू महाराजांनी इमारत बांधण्यासाठी २५००० चौरस / फूट जागा दिली व त्यावर इमारत बनविण्यासाठी ₹ ५५०० देणगीही दिली. संस्थानाच्या जंगलातून (१२५ वर्षांपूर्वी) सागवान लाकूड देण्यात आले आणि पाहता पाहता त्या ठिकाणी दोन मजली इमारत उभी झाली. इतकेच नव्हे तर वार्षिक ₹ २५० इतके अनुदान देखील जाहीर केले. मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी शाहू महाराजांचे योगदान मुस्लिम समाज कधीही विसरू शकत नाही. त्यांनी संस्थांनातील मुस्लिम धार्मिक स्थळ असलेल्या दर्ग्याचे उत्पन्न देखील बोर्डिंगला दिले. राजर्षी शाहू महाराजांची जागा कोणी घेऊ शकत नाही.
राजर्षी शाहू महाराजांनी मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली. शाहू महाराजांनी मुस्लिमांची शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी प्रयत्न केले. मुस्लिमांच्या मागासलेपणाची चेष्टा केली नाही. कठीण परिस्थिती असूनही, त्यावेळी महात्मा फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांना मदत करणारे गफ्फार मुन्शी बेग, उस्मान शेख, फातिमा शेख यांना शाहू महाराजांनी आपल्या कार्याद्वारे जिवंत ठेवले.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून शाहू राजांनी केलेलं कार्य या देशातील प्रत्येक घटकाला विचार करण्यास प्रवृत्त करणारे व सकल भारताच्या समता,बंधुत्वता व राष्ट्रीय एकात्मता या त्रिसूत्रीची जोपासना करणारा हे शाहू राजा खरोखरच विद्यमान परिस्थितीत ही या भारताच्या संविधानाचा रक्षणकर्ता आहे असेच म्हणावे लागेल. त्यांच्या विचारांना व कृतिशील कार्याला अभिवादन!
विस्तृत लेख, धन्यवाद
उत्तर द्याहटवा