पाटणा - फक्त कायदा करून देशाची लोकसंख्या नियंत्रित होणार नाही. यासाठी आणखीही उपाययोजना कराव्या लागतील, असे संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे.
देशाला लोसंख्या नियंत्रण कायद्याची गरज आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा बोलताना ते म्हणाले की, ज्या राज्यांना कायदे करायचे आहेत ते करू शकतात. पण लोकसंख्या फक्त कायदा बनवून नियंत्रणात येणार नाही. ते शक्यही नाही.
चीनने एकवरून दोन आपत्यांना परवानगी दिली आहे. आता दोन नंतर काय होतंय? कुठल्याही देशाची स्थिती पाहा. महिला शिक्षित झाल्यावर जन्मदर हा आपोआपच कमी होतो. सर्वेतूनही हेच समोर आले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लोकसंख्या वाढ कशी कमी करता येईल, यावर आपले विचार स्पष्ट आहेत. ही बाब सर्व समाजांना लागू होते. महिला शिक्षित असतील तर जन्मदर कमी करता येऊ शकेल, असे ते म्हणाले. शेजारच्या उत्तर प्रदेश राज्यात लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी तेथील योगी सरकारने नवा कायदा तयार केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी त्या कायद्याचा मसूदा उघड करण्यात आला आहे. त्यानुसार ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्ये असतील त्यांना यापुढे सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागू शकते. सरकारी नौकरी मिळणार नाही, निवडणुका लढता येणार नाहीत असे या कायद्याचे सर्वसाधारण स्वरूप आहे. त्यामुळे देशात लोकसंख्या नियंत्रणाच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे. त्यावरच आता नितीश यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा