अहमदनगर : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टर गणेश शेळके (Dr Ganesh Shelke) यांनी आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच अहमदनगरमध्ये घडली होती. आता या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात माहिती दिली.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून 45 वर्षीय डॉ गणेश शेळके यांनी दोन दिवसांपूर्वी टोकाचं पाऊल उचललं होतं. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गणेश शेळके हे आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते.
मंगळवार सहा जुलै रोजी दुपारी आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली होती.
नेमकं काय घडलं होतं?
एकीकडे लसीकरण सुरु असतानाच डॉ गणेश शेळके यांनी उपकेंद्रातील आपल्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन गळफास घेतला होता. बराचवेळ झाला तरी डॉक्टरांनी दरवाजा उघडला नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळकेंना आवाज दिला. तरीही दरवाजा न उघडल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले.
सुसाईड नोटमध्ये काय?
आपल्या आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे डॉ गणेश शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. इतकेच नाही तर पगार वेळेवर नाही, अतिरिक्त भार आणि पगार कपात करण्याची धमकी देत असल्याने आत्महत्या करत असल्याचे डॉ. शेळके यांनी लिहिले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली होती.
डॉ शेळके यांच्यावर अन्याय झाला असून दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा डॉ. शेळके यांच्या नातेवाईकांनी दिला होता. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हसन मुश्रीफ काय म्हणतात?
पगार झाला नसल्याचा आरोप डॉक्टरांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. तरी यात कोणाचा व्यक्तिगत स्वार्थ नाहीये, त्यामुळे पोलिस तपास करत असून हे प्रकरण संयमाने घेतले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. सुसाईड नोटमध्ये उल्लेख असलेले वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे आणि तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह कलेक्टरला या प्रकरणी जबाबदार धरले जात आहे. तहसीलदार श्याम वाडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगून कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला होता. तर डॉ भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा