प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी
अकिवाट : कोरोना महामारीमुळे अगदी मोठ्या उद्योगपती पासून ते सामान्य माणसांपर्यंत सर्वांनाच मोठा फटका बसला असताना सामान्य शेतकरी व शेतमजूरांची ही मोठी कुचंबना होत आहे.कोरोना काळात अनेक उद्योग बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि बहुतांशी नोकरी गेलेली लोक शेतीकडेही वळली.पण लॉकडाऊनमुळे फळे व भाजीपल्याला दर भेटत नाही, त्यामुळे शेतकरी ऊस या नियमित व खात्रीशीर असलेल्या पिकावर आस लावून बसलेला आहे. पण वातावरण बदलामूळे ऊस पिकावरही अनेक संकटांचा मारा होत आहे.
लॉक डाऊनमध्ये भाजीपाल्याच्या पिकामध्ये तोट्यात आलेला शेतकरी अपेक्षेने ऊसाकडे पाहत होता पण निसर्गाच्या लहरीपणामुळे उसावर मोठ्या प्रमाणात तांबेरा व लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव झाला आहे त्याचबरोबर जमिनीतून हुमणीचा ही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे ऊस पिकाची वाढ खुंटली आहे व त्याचा परिणाम म्हणून अपेक्षित उत्पादन, उत्पादकता व उत्पन्नात घट होणार आहे.त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. रिकाम्या शेतामध्ये असणारा भुईमूग, सोयाबीन व मिरची या पिकांचे देखील अतिवृष्टीने नुकसान झालेमुळे साहजिकच त्यांच्या उत्पन्नात घट होणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी लाभदायक शेती कशी करायची व कौटुंबिक खर्च कसा भागवायचा या विवंचनेत शेतकरी आहे. शासन यावर काही उपाययोजना करते काय याकडे बळीराजाचे डोळे लागलेले आहेत.
या सगळ्या बरोबरच महापुराची भीती सुद्धा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकत आहे. या कोरोना विषाणू,लॉकडाउन आणि पीक रोगाच्या या संकटाबरोबर जर महापूराने दार ठोठवले तर खूप भयंकर परिस्तिथी निर्माण होईल या भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.
शासनाने याकडे वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवावा ही समस्त शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा