सातारा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळे याठिकाणी एका युवकाने बैलाची क्रूरपणे हत्या केली होती. या घटनेनंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना तपास करत युवकाला अटक केली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बैलाची हत्या केल्याचे कारण तपासादरम्यान सांगितले.बैलाचे पाय आणि शेपटी कापून मारून टाकणारा गजाआड...
कुमार प्रकाश पडवळ (वय 28) असे आरोपीचे नाव असून, तो वाई तालुक्यातील कुंभारवाडी येथील रहिवासी आहे. आरोपीने काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील बैल बाजारातून एक शर्यतीचा बैल खरेदी केला होता.
हा बैल घरी घेऊन जात असताना एका वाहनाने या बैलाला धडक मारली. यामध्ये हा बैल जखमी झाला. यामुळे या जखमी बैलाचा सांभाळ कसा करायचा? या विचारातून संबंधित युवकाने बैलाला जावळी तालुक्यातील सरताळे येथील निर्जनस्थळी नेले.
परिसरात कोणी पाहात नसल्याचे समजल्यानंतर त्याने बैलाला एका झाडाला बांधले आणि त्याच्या नरड्यावरून सुरा फिरवला. दुसऱ्या क्षणात हा बैल रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पिकअप घेऊन पळ काढला होता. ही घटना उघडकीस येताच मेढा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास केल्यानंतर सहा दिवसांनी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी बैलाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिकअप गाडीही जप्त केली आहे.बैल केवळ रस्ते अपघातात जखमी झाला म्हणून तरुणाने या बैलाची हत्या केली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मेढा पोलिस करत आहेत.
खूप वाईट काम
उत्तर द्याहटवा