Breaking

गुरुवार, ८ जुलै, २०२१

मिरज शहरात दहशत निर्माण करणारी टोळी तडीपार

 


      मिरज शहरात टोळी निर्माण करून खून, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत, खंडणीसाठी अपहरण करणे इत्यादी 6 गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सलीम पठाण (सल्ल्या टोळी)ला सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी हद्दपार केले.

     तडीपार करण्यात आलेले कुख्यात गुंड सलीम गौस पठाण (वय ३१, रा. मंगळवार पेठ, मिरज), गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी (३१ वडर गल्ली, मिरज), प्रथमेश सुरेश ढेरे (२० रा. मंगळवार पेठ, मिरज), चेतन सुरेश कलगुटगी (३४ रा. वडर गल्ली, मिरज) आणि अनिस शब्बीर शेख (२५, रा. ख्वाजा वस्ती, मिरज) अशी त्यांची नावे आहेत.

    सलीम पठाण याच्या टोळीने मिरज शहरात गेल्या अनेक वर्षापासून दहशत निर्माण केली होती. त्याच्या टोळीने सन २०१७ ते २०२१ दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्राने खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, खंडणीसाठी अपहरण करणे इत्यादी घटना या टोळीने केल्या होत्या. या घटनेमुळे मिरज शहर व परिसरात प्रचंड मोठी दहशत निर्माण झाली होती.

    मंगळवार पेठ आणि वडर गल्ली या परिसरासह मिरज शहर आणि महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलीम पठाण याच्या टोळीने छोट्या, मोठ्या गुन्ह्यातून मोठी दहशत निर्माण केली होती. मंगळवार पेठमध्ये या टोळीने चांगलेच बस्तान बसविले होते. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेता मिरज शहर पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी वरील पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 55 अन्वये सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यासाठी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. याबाबत पोलिस अधीक्षक गेडाम यांनी पोलिस उपअधीक्षक मिरज यांचा अहवाल, टोळी विरोधी गुन्हे, सद्यस्थितीचा अहवाल, टोळीच्या हालचाली, टोळीतील सदस्यांचे म्हणणे एकूण घेवून टोळीची सलग सुनावणी घेवून त्यांना तीन जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा