![]() |
पोलीस निरीक्षक जयसिंगपूर, राजेंद्र मस्के |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. राजेंद्र मस्के यांनी आई वृध्दाश्रमातील सर्वच अनाथ व निराधार वृध्दांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
मुलांनी सांभाळण्यास नकार दिलेल्या,समाजापासुन दुर फेकले गेलेल्या आणि आई वृध्दाश्रमात एकाकी जीवन जगणाऱ्या माता - पित्यांचे वाढदिवस आता खाकी वर्दीतला हा मुलगा धुमधडाक्यात साजरा करून त्यांच्या चेह-यावर आनंद निर्माण करणार आहे.
जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नव्यानेच पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के यांनी आई वृध्दाश्रमास भेट दिली. आई वृध्दाश्रमाच्या स्थापनेची आणि वृद्धांची करून कहाणी जाणुन घेतली आणि आई वृध्दाश्रमाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ग्वाही दिली. तसेच राजेंद्र मस्के यांच्या संकल्पनेतून आई वृध्दाश्रमातील अनाथ व निराधार वृध्दांना सामाजिक आधार देण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी सर्वच वृद्धांचे वाढदिवस साजरे करण्याची घोषणा केली. या वाढ दिवसाच्या दिवशी स्वतः वृध्दाश्रमात हजर राहुन त्यांच्या पगारातून या वृध्द माता पित्यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त नवीन कपडे , केक आणि सर्वांना खाऊचे वाटप करून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार आहेत.
आयुष्याच्या संध्याकाळी मुलांनी आणि कुंटूंबानी बहिष्कृत केलेल्या आणि आयुष्यात कधीही वाढदिवस साजरे न झालेल्या वृद्धांचे वाढ दिवस खाकी वर्दीतला मुलगा साजरा करणार ही संकल्पनाच समाजाला अंतर्मुख व विचार करायला लावणारी आहे. जन्मदात्या आई वडिलांना वृध्दाश्रमाचा रस्ता धरायला लावणा-या नालायक मुलांना ही एक मोठी चपराक आहे.
राजेंद्र मस्के यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचे सर्वच समाज घटकाकडून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा