Breaking

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

दत्त उद्योग समूहाच्या वतीने वयाच्या ५२ व्या वर्षी पदवी संपादन केलेल्या सदाशिव आंबी यांचा सत्कार करून केला सन्मान


सदाशिव आंबी यांचा सत्कार करताना मा.गणपतराव पाटील


गणेश कुरले : शिरोळ प्रतिनिधी


शिरोळ : व्यक्तीने ठरविले तर अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवता येते. गणेशवाडी सारख्या ग्रामीण भागातील व्यवसायाने नावाडी असलेल्या सदाशिव आंबी यांनी वयाच्या ५२ व्या वर्षी ८३.३३% गुण मिळवून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी संपादित करून तरुणाई समोर एक आदर्श ठेवला. त्यांच्या या यशाचे कौतुक शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी करून त्यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार केला.

सदाशिव आंबी, गणेशवाडी

     शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव आंबी यांनीही विद्यार्थी होऊन परीक्षा देऊन यश मिळविण्यासाठी वयाचे कोणतेच बंधन नसते हे दाखवून दिले आहे.

        सदाशिव आंबी हे नावाडी असून शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील सर्व गावांना परिचित आहेत . २००५, २००६, २०१९ व २०२१ या वर्षी आलेल्या महाप्रलयकारी महापुरातून आपल्या नावेने  हजारों लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे  काम त्यांनी केले आहे. विविध सामाजिक कामात नेहमी त्यांचा सहभाग असतो . शिकण्याची जिद्द व चिकाटीच्या आधारावर ५२ वर्षाच्या सदाशिव आंबी यांनी तब्बल ३० वर्षांनंतरच्या  कालखंडानंतर नावेत बसूनच अभ्यास पूर्ण केला व डॉ. जे. जे. मगदूम महाविद्यालयातुन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमधून पदवी संपादन केली. आज शिक्षण न घेणाऱ्या व मध्येच शिक्षण सोडून जाणाऱ्या वंचित घटकांना, विद्यार्थ्यांना सदाशिव आंबी हे आदर्शवत ठरले आहेत. समाजाच्या अखंड सेवेचे व्रत घेऊन पदवीचे शिक्षण प्राप्त केल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशातून तरुण आणि विद्यार्थी प्रेरणा घेऊन आपलेही जीवन घडवतील अशा शुभेच्छा गणपतराव पाटील यांनी यावेळी दिल्या. त्यांचा सन्मान व सत्कार करून दत्त उद्योग समूहाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी दत्तचे संचालक अनिलराव यादव, ऍड. प्रमोद पाटील, महेंद्र बागी, शिवमूर्ती देशींगे, बाबासो गौराज, अरुणकुमार देसाई, जनगोंडा पाटील, आर  डी. पाटील, बापूसो पाटील, महालिंग पाटील, दादनशहा फकीरआदी मान्यवर उपस्थित होते. सदाशिव आंबी यांना जीवनरक्षा पदक, राष्ट्रपती पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार देखील मिळाला आहे.

       सदाशिव आंबी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा