Breaking

गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान ही कमजोरी वा मजबुरी नसून तेच खरे वैश्विक बलस्थान : प्रा.डॉ. संतोष जेठिथोर

 


प्रा. डॉ. संतोष जेठीथोर,साधन व्यक्ती


मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


सोलापूर : महात्मा गांधी शांती,प्रेम आणि सद्भावना या विचाराने प्रेरित झाले होते. सत्य आणि अहिंसा हा त्यांच्या विचाराचा पाया होता. महात्मा गांधी यांनी सामाजिक व राजकीय सुधारणांचे प्रवाह एकाचवेळी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जगामध्ये गांधींचा भारत अशी आपल्या देशाची ओळख आहे. महात्मा गांधी यांचे तत्वज्ञान ही कमजोरी वा मजबुरी नसून तेच खरे बलस्थान आहे. त्यामध्ये आत्मनिर्भरता आहे. महात्मा गांधीचे विचार व तत्वज्ञान आचरणात आणले तर भारत विश्वगुरु होईल आणि शोषितांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल असे प्रतिपादन शिवाजी विदयापीठ कोल्हापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सल्लागार समिती सदस्य डॉ. संतोष जेठीथोर यांनी केले.


   पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए. आर.बुर्ला महिला महाविदयालयातील आयक्यूएसी, इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान' या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे होते. 

     वेबिनारच्या पहिल्या सत्रात प्राचार्य- डॉ. राजेंद्र शेंडगे यांच्या हस्ते महात्मा गांधी लालबहादुर शास्त्री व रामचंद्रशेठ बुर्ला यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये माजी प्राचार्य डॉ. सोपान जावळे यांचे बीजभाषण झाले. पुढे बोलताना डॉ जेठिथोर म्हणाले की,महात्मा गांधोनी ब्रिटीशाविरोधी लढा देत असताना देशाच्या सामाजिक स्थितीकडे लक्ष केंद्रित केले होते. महात्मा गांधी जेव्हा येरवडा तुरुंगात होते तेव्हा त्यांनी उपोषण केले होते. या उपोषणामागे सवर्णांमध्ये मानसिक क्रांती घडवून आणणे हा त्यांचा हेतू होता. त्यांनी शोषितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांच्यातील अज्ञान दूर करण्याचा त्यांनी आग्रह धरला. यातूनच त्यांनी मजूरांच्या न्यायहक्कासाठी लढा सुरु केला महात्मा गांधी यांचे कार्य त्यांचे तत्वज्ञान याचा अंगीकार केल्यास शोषितांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल.

    माजी प्राचार्य डॉ. सोपान जावळे आपल्या बीजभाषणात म्हणाले की, कठोर परिश्रम शुध्द चारित्र्य, विनम्रपणा, आदर्शवाद, व्यवहारचातुर्य ही महात्मा गांधींची बलस्थाने होती. महात्मा गांधी यांनी या बलस्थानामुळेच ब्रिटीशांविरोधी चंपारण्य सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि चले जाव चळवळ अशा मोठया चळवळी उभारल्या जनतेला करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला आणि ब्रिटीशांना भारत सांडून जाण्यास सांगितले. महात्मा गांधी यांच्या या कार्यामुळेच भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही जनतची चळवळ बनली आणि या जनतेच्या चळवळीमुळेच ब्रिटीशांना भारत सोडावा लागला.

     या राष्ट्रीय वेबिनारचे प्रास्ताविक डॉ.टी.एन. शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आर. के. वडजे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु. संध्या सरवदे हिने करून दिला. उपस्थितीतांचे आभार कु. प्रणाली पुकाळे हिने मानले.सदर वेबिनारमध्ये ३२७ प्राध्यापक व विदयार्थी सहभागी झाले होते. 

         सदर राष्ट्रीय वेबिनार यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागप्रमुख डॉ. टी. एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनचे अधिकारी डॉ. आर. के. वडजे व प्रा. रंजना बनसडे आणि कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

1 टिप्पणी: