दिल्लीत एका महिलेवर ॲसिडफेक |
देशात महिलांच्यावर अन्याय व अत्याचार होत असल्याची बाब नित्याची बनत चालली असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. समाजाकडून अबला म्हणून मानल्या जाणाऱ्या महिलांच्यावर अन्यायाची परिसीमा गाठली आहे.असाच एक अत्यंत दुःखदायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून अस्वस्थ असलेल्या माथेफीरू तरुणाने विवाहित महिलेवर अॅसिड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपीने पोलिसांवर देखील गोळीबार केला आहे. या अॅसिड हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने पीडित महिलेला भेटण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले. महिला घरी येताच तिला दोरीने बांधले आणि तिच्यावर अॅसिड फेकले. या विकृत घटनेनंतर आरोपीला बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, दिल्लीमधील बवाना परिसरातील ही घटना असून एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मोंटू असं आरोपीचं नाव असून हल्ल्यानंतर तो बिहारमध्ये पळून गेला होता. त्याला आता बक्सर जिल्ह्यामधून अटक करण्यात आली आहे. या दरम्यान संशयित आरोपीस पोलीस आल्याची माहिती मिळताच त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. गोळीबारामध्ये आरोपी मोंटू हा जखमी झाला आहे. त्याला दिल्लीमध्ये आणण्यात आले असून त्याच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदर पीडित महिला ही विवाहित असून ती दिल्लीमध्ये तिच्या पतीसोबत राहात होती. तिचा पती एका स्थानिक कारखान्यामध्ये कामाला होता. मोंटू हा देखील पीडितेच्याच गावचा रहिवासी आहे. आरोपी या महिलेवर एकतर्फी प्रेम करत होता. पतीला सोडून तू माझ्यासोबत राहायला ये अशी मागणी आरोपी वारंवार या महिलेकडे करत होता. मात्र तसे करण्यास महिलेने नकार दिल्याने तो संतापला आणि तिच्यावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या विकृत घटनेने सदर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा