Breaking

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि संग्राम संस्था सांगली यांच्यामार्फत"बेटी बचाओ" अभियानांतर्गत घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन

 

शिवाजी विद्यापीठात घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन


प्रा.अक्षय माने  : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


  कोल्हापूर :  समाजातील पुरुषप्रधान मानसिकता संपली पाहिजे. मुलींना शिक्षणाचा हक्क, नोकरीतील समानता आणि मालमत्तेमध्ये समान हक्क मिळालाच पाहिजे. स्त्रियांच्या हक्कांसाठी झुंजणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दि. ३ जानेवारीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊ जयंती दि. १२ जानेवारी पर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार व जबरदस्ती विरोधात घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन केले आहे. 

    विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत "बेटी बचाओ अभियान" आणि संपदा ग्रामीण महिला संस्था (संग्राम), सांगली अंतर्गत "विद्रोही महिला शक्ती जथ्था" यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "जबरदस्तीत कसली मर्दानगी" या कार्यक्रमांतर्गत विद्यापीठातील विविध अधिविभाग व कोल्हापूर, सांगली व सातारा  जिल्ह्यातील  संलग्नित महाविद्यालयातील प्रवेशित सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी वरील विषयाला अनुसरून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

      घोषवाक्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठामार्फत दिलेल्या गुगल शीटमध्ये स्वतःबद्दलची आवश्यक ती माहिती व कॉलेजचे विद्यार्थी आयडी कार्डासह दोन घोषवाक्य दि. ३० जानेवारी २०२२ अखेर पाठवून द्यावयाचे आहेत. यानंतर आलेल्या स्पर्धकांचा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला जाणार नाही. 

   तसेच विद्यार्थ्यांनी पाठवून दिलेली घोषवाक्य तज्ञसमिती मार्फत तपासून घेतली जातील. ती इतर ठिकाणातून घेतलेली नाहीत याची खात्री करून निवड केलेल्या घोषवाक्यामधून मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेनुसार पहिले, दुसरे, तिसरे व उत्तेजनार्थ पारितोषिंकासाठी घोषवाक्यांची  निवड करण्यात येईल. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने पाठवण्यात येईल.

घोषवाक्य स्पर्धेसाठी पहिले बक्षीस रुपये  १५००/- दुसरे बक्षीस रुपये १०००/- तिसरे बक्षीस रुपये ५००/- प्रत्येक भाषेसाठी व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आलेले आहे .या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जागतिक महिला दिन दि. ८ मार्च २०२२ रोजी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करण्यात येईल ,ऑफलाईन पद्धतीने बक्षीस वितरण समारंभ झाल्यास कार्यक्रमाचे ठिकाण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर असेल, अशी माहिती "बेटी  बचाओ" अभियान प्रमुख मा. प्रा. डॉ. प्रतिभा देसाई व संग्राम संस्थेच्या प्रमुख जेष्ठ समाजसेविका मा. मीना सेशू यांनी संयुक्त पत्रकाद्वारे दिलेली आहे.

     अधिक माहितीसाठी संपर्क नंबर:-

          ९८२२७६५२४८ /९९६०९५७५१८

1 टिप्पणी: