Breaking

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्ताने गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय येथे सर सी. व्ही. रमन यांचे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न.





कोल्हापूर : गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय, संशोधन कमिटी  यांचे वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन हा सर सी.व्ही.रामन याची प्रतिमा पूजन करून साजरा करणेत आला. 

जी के गोखले कॉलेज उपप्राचार्य श्री एस एच पिसाळ यांनी प्रतिमा पूजन केले. सुपरवायझर श्री एस एन मोरे सर हे यावेळी उपस्थित होते. 

प्रा. श्री अजितकुमार गाईंगडे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. सुनिता स्वामी यांनी प्रास्ताविक केले. 

डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले- 

२०२२ हे वर्ष इंटिग्रेटेड ॲप्रोच इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू सुस्टेनेबल  फ्युचर या थीम नुसार जागतिक लेव्हल वर साजरे  होत आहे. 

२८ फेब्रुवारी १९२८ हा दिवस सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल  राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित केला गेला. याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे होय. बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे असे नमूद केले.



अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य पिसाळ सर यांनी 

 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे असे सांगून पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला असल्याची खंत बोलून दाखवली. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली. त्यातही गेल्या काही दशकात, इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि नंतर कॉम्प्युटरच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तर, ही वाढ घातांकाच्या श्रेणीने होत आहे. आज अवकाशात झेप घेऊन, सागरात सूर मारून माणूस शब्दश: त्रिलोकसंचारी झाला आहे. मूलभूत गरजांच्या पूर्ततेपासून चैनीच्या वस्तूंच्या सहज उपलब्धतेपर्यंत, सगळयाच गोष्टी, विज्ञानामुळेच साध्य आणि शक्य झाल्या आहेत. व्यक्तिगत परिचर्येपासून सामाजिक स्थैर्यापर्यंत, सर्वच क्षेत्रांत विज्ञानाची प्रगती, तिचं सहज विस्मरण होण्याइतकी झाली; पण या सगळया प्रगतीबरोबर जी मानसिकता यायला हवी, ती येत नाही. विज्ञानाची प्रगती कुतूहल, चौकसपणा या गुणांच्या आधारावर सृष्टीची कोडी उलगडण्याच्या प्रयत्नातून झाली; पण ही चिकित्सेची, सत्य शोधण्याची जाणीव काही रुजलेली दिसत नाही. का, कसं हे कुतूहल नाही, म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. मुख्य म्हणजे हा अभाव सगळीकडेच जाणवतो. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, घरापासून व्यवसायापर्यंत सगळीकडेच! निरक्षरता किंवा अपुरं शिक्षण, हे त्याचं कारण नाही, कारण जिथे आपण शिक्षण घेतो, त्या शाळा, कॉलेजांमध्येही, ही चिकित्सेची जाणीव करूनच दिली जात नाही. माहितीचा साठा आजच्या स्पर्धेच्या युगात हवा हे खरंच; पण कार्यकारणभाव शोधण्याची सवय होणं, तितकंच गरजेचं आहे. विज्ञान म्हणजे, केवळ जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, एवढंच नाही, तर समाजशास्त्रंही त्यातच येतात, कारण तिथेही कार्यकारणभाव आणि चिकित्सा लागतेच. म्हणूनच विज्ञान हे आपलं आहे, लोकांचं आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं आहे. खऱ्या अर्थानं लौकिक आहे, इहलौकिक आहे असा विचार प्रामुख्याने मांडला.

प्रा. एन आर कांबळे यांनी शिक्षण प्रसारक मंडळ सर्व मान्यवर, सेक्रेटरी मा. प्रा. श्री. जयकुमार देसाई, पेट्रोन कौन्सिल मेंबर मा. दौलटकुमार  जे देसाई आणि ऍडमिनिस्त्रेटिव ऑफिसर डॉ. मंजिरी ए. मोरे यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देऊन शास्त्रीय दृष्टिकोन वाढण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

प्राचार्य. डॉ. पी. के पाटील यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. सर्व विदयार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा