![]() |
अग्रणी कॉलेज कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सुप्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा. डॉ. पी.एस. कांबळे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूरच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय व अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने रशिया -युक्रेन युध्दाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम' या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध अर्थशास्त्र प्रो. डॉ. पी. एस. कांबळे व उद्घाटक मा.विनोदभाऊ घोडावत व कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जयसिंगपूर भूषण मा. विनोदभाऊ घोडावत यांनी महाविद्यालयाच्या शाळा समितीचे चेअरमन म्हणून त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून आजच्या ज्वलंत विषयावर कार्यशाळा घेल्याबद्दल महाविद्यालय व प्रमुख वक्त्यांचे कौतुक केले.
एक दिवसीय कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठाचे सुप्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा.डॉ. प्रकाश कांबळे यांनी रशिया-युक्रेन युध्द आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, जागतिक महासत्तेच्या पटलावर अमेरिका व नाटो देशांच्या अप्रत्यक्ष नेतृत्वाखाली रशियासारख्या बलाढय देशाबरोबर युद्ध करणारा छोटासा युक्रेन देश किंबहुना जागतिक सत्तेच्या सारीपाटात विकसनशील देशांची होणारी फरफट याबाबत सांगोपांग विवेचन केले. याच पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेची वास्तवता व जागतिक डिप्लोमॅसी च्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थितीचा वास्तव दर्शन आपल्या उत्तम व्याख्यानातून घडविले.इतर देशाच्या तुलनेत रूपयाची सद्यस्थिती मांडली. 'नाटो' म्हणून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष होणा-या प्रभावाची चर्चा केली. तर दुस-या सत्रात रशिया युक्रेन युध्दाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयी बोलताना रशिया व युक्रेन मध्ये भारतीय गुंतवणुकीचे होणारे नुकसान व फायदा या विषयी माहिती दिली. क्रूड ऑईल संरक्षण व इतर वस्तूच्या महागाईची चर्चा केली. त्याचबरोबर भारताची या दोन्ही देशांबरोबर तटस्थ भूमिकेविषयी कौतुक केले. जागतिक सत्तेच्या सारीपाटात भारताची भूमिका विशद केली. या परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था सक्षम असल्याबाबत त्यांनी सूतोवाच केला.
उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक यांनी महाविद्यालयीन कार्याचा आढावा घेवून एक दिवसीय कार्यशाळे विषयी असणारी प्रासंगिकता सांगितली.
समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द उद्योगपती व शाळा समिती सदस्य मा. प्रीतम देमापुरे यांनी कार्यशाळेविषयी आपले मत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी कार्यशाळा सफल झाल्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. अग्रणी महाविद्यालयांतर्गत ८ महाविद्यालयातून ८५ विद्यार्थी व १५ सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या कार्यशाळेचे स्वागत अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ. गजानन चव्हाण व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे डॉ. संदीप रावळ यांनी केले. पाहुण्यांचा परिचय माजी प्र. प्राचार्य डॉ. ए. एस. भिलवडे यांनी करून दिला. आभार प्रो. डॉ. विकास मिणचेकर व डॉ. वर्षा शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन सौ. अर्पिता चौगुले यांनी केले.
या कार्यशाळेसाठी प्रा. जे. एन. तांबोळी, प्रा. डॉ. पी. डी. चंदनशिवे, प्रा. डॉ. सौ. माधुरी शिंदे, प्रा. डॉ. यु. ए. पाटील, प्रा. सौ. पी. ए. पाटील आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
या अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत सद्य परिस्थितीत रशिया युक्रेन च्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचे उचित विवेचन व्हावे व विषयाला साजेसं, अभ्यासपूर्ण विवेचन व मांडणी करणारे अभ्यासू वक्ता म्हणून सुप्रसिद्ध अर्थतज्ञ प्रा. डॉ. पी एस कांबळे यांच्याविषयी किंबहुना कॉलेजच्या आयोजनाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया सहभागी प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा