Breaking

शनिवार, २३ जुलै, २०२२

*स्त्रिच्या नजरेतून पाहताना या कर्तुत्ववान मातेसाठी दोन शब्द*


महामहीम राष्ट्रपती मा.द्रोपदी मुर्मू


लेखिका मा.सौ.आरती अनिल लाटणे, इचलकरंजी

   शिक्षकी पेशाला दुसऱ्यांदा राष्ट्रपतीचा बहुमान मिळवून देणाऱ्या माननीय मुर्मू मॅडम आपले खरोखरच मनापासून अभिनंदन. बैदापोसी सारख्या अतिसामान्य तेही आदिवासी भागामध्ये राहून तुम्ही उत्तुंग भरारी घेतलात. नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आदिवासी पाडा आज जगाच्या कानाकोपऱ्यात नावारूपाला आला. ज्या मातीच्या घरात तुम्ही वावरलात, ज्या संथाल आदिवासी समूहांनी आपल्यावर इतके सुंदर संस्कार केले त्या प्रत्येक घरात नव्हे तर भारताच्या प्रत्येक स्त्रीच्या मनामनात आज अभिमानाची दिवाळीच साजरी होत आहे. 

       स्त्री म्हणून स्वतःला सिद्ध करत असताना कित्येक महिलांची दमछाक होते. मान्य आहे तुम्हाला राजकीय धड्यांचे बाळकडू वडील,आजोबा यांच्याकडून घरातूनच मिळाले. परंतु विवाहानंतर कौटुंबिक जबाबदारी आणि राजकीय जबाबदारी ही तर तारेवरची कसरत झाली असेल हे काही सांगायलाच नको. मात्र त्याहूनही अचंबित करणारी गोष्ट म्हणजे आपण आपल्या कुटुंबावर आलेली अनेक संकटे, अनेक दुःखाचे डोंगर कसे बरे झेललात? 

       लग्नानंतर पती व अपत्य हीच तर महिलांची सुख, संपत्ती असते. या संपत्तीलाच तुमच्या आयुष्यात खूप लवकर सुरुंग लागला. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले काळजाचे घड गळून पडले.अर्थात मोठा मुलगा झोपेतच तर छोटा मुलगा अपघातात मरण पावला. हे दुःख कमी होतं की काय म्हणून वयाच्या 55 नव्या वर्षी पती तुम्हाला दुःख सागरात लोटून निघून गेले.

        एवढा मोठा दुःखाचा डोंगर झेलूनही त्याला कुरवाळत न बसता तुम्ही राजकीय दबदबा कायम राखलात. वडील आणि आजोबा सरपंच होते याहीपेक्षा खरी सुरुवात तुमची तुमच्या वर्गातून झाली म्हणायला हरकत नाही. शालेत तुम्ही मॉनिटर होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे शालेय मॉनिटर आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे. मुलांच्या दुःखातून स्वतःला सावरत आपण जिल्हा परिषद उपाध्यक्ष,राज्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती असे एक एक टप्पे पादाक्रांत करत गेलात. खरंच आपल्यातील आईला शतशः सलाम करावासा वाटतो.

           जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये सर्वोच्च पदावर आज आपण विराजमान आहात. संविधानाने बहाल केलेला सर्वोत्कृष्ट सन्मान आज तुमच्या रूपाने देशाला पहायला मिळत आहे. साहजिकच आहे आम्ही देखील संविधानाचे आणि आपले मनापासून अभिनंदन करतो. एका सामान्य कुटुंबातील त्यातल्या त्यात दुर्लक्षित राहणाऱ्या आदिवासी भागातून आलेल्या महामही आज आपण आदिवासी पहिली राष्ट्रपती आणि देशाच्या दुसऱ्या राष्ट्रपती म्हणून बहुमान मिळवला आहे. खरोखरच आज प्रत्येक स्त्रीच्या पुढे एक आदर्श आहात.

       डोळ्यावर कोणत्याही राजकीय भेदभावाचा पडदा न बांधता आणि राजकीय डावपेचाचा चष्मा न घालता एक माणूस म्हणून विचार केला, तर आपल्या प्रगतीचा आलेख प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यातून अभिमानाचे चार थेंब ओघळावेत इतकं अतुलनीय कर्तुत्व आपण सिद्ध केलात. खरंच आपण ग्रेट आहात.


लेखिका सौ.आरती अनिल लाटणे, इचलकरंजी

मोबाईल नंबर 99 70 26 44 53

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा