✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक, जय हिंद न्यूज नेटवर्क
सर्पपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा....नाही नाही, मला सर्पपंचमीच म्हणायचं आहे,नागपंचमी नव्हे. आम्हा सर्पमित्रांसाठी सर्प पंचमीच. कारण नाग हा सर्पाचा एक प्रकार आहे आणि आम्हाला सगळे सर्प सारखेच.
हिंदू धर्मात नाग सापाला विशेष मानाचे स्थान आहे म्हणून त्याची पूजा होते.( तसं प्रत्येक धर्माने सगळं काही वाटूनच घेतलं आहे म्हणा... असो तो मुद्दा वेगळा). आता गरज आहे ती सर्वच साप/प्राणी वाचवण्याची. कारण 'दिसला साप की मार' हेच चित्र सर्वत्र दिसून येते. कारण फक्त आजच्या दिवशीचा हा देव/नाग नेहमीचा शत्रू/मृत्यू ही मानसिकता. हे खरं देखील आहे की सापाचे विष जीव घेवू शकते,पण सर्वच साप विषारी नाहीत. भारतात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके साप विषारी आहेत (नाग,घोणस,मण्यार,फुरसे, चापडा,हिरवा घोणस, समुद्री सर्प यातीलही हिरवा घोणस – घनदाट जंगलात तर समुद्री सर्प – समुद्रात राहत असल्यामुळे यांचा मानवाशी सहसा संपर्क येत नाही.) व बाकी सर्व बिनविषारी आणि निमविषारी ज्यापासून माणसास कसलाच धोका नाही.
◆ जिवंत नागाच्या पुजेविषयी थोडं
बत्तीस शिराळा येथे आजच्या दिवशी जिवंत नागाची पूजा केली जाते,व हीच क्रेझ आता इतर भागातही दिसून येत आहे. तुम्हाला माहितेय तुम्ही ज्या फक्त आजच्या दिवसाच्या देवाची/सापाची मनोभावे पूजा करता त्याचे किती हाल होतात ? एक दोन महिने आधीपासून त्या नागाला पकडून ठेवले गेलेले असते, तुम्ही जे हळद कुंकू लावता – सापांना पापण्या नसल्यामुळे ते हळद कुंकू त्यांच्या डोळ्यात जाते व त्यातील ऍसिड मुळे सापांचे डोळे जातात. तुम्ही पाजत असलेले दूध त्यांच्या शरीरास हानिकारक असल्यामुळे त्याच्या जीवावर बेतते. काही गारुडी सापाचे विषाचे दात तोडतात, तसेच तो चावू नये म्हणून त्याचे तोंड शिवतात .तुम्ही पुजलेले जिवंत साप बऱ्यापैकी मृत्यू पावतात. त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की,सर्पपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्यापेक्षा प्रतीकात्मक मूर्तीची पूजा करा.
◆ आता थोडं सर्पमित्रांबद्दल
सर्पमित्र- जे सापाला कोणतीही इजा न करता पकडतात व कसलाही गाजावाजा न करता लगेच सुरक्षित ठिकाणी सोडतात. जखमी असेल तर उपचार करतात तेही मोफत सेवा देवून काही जण अगदी नगण्य फी( फक्त गाडी खर्चापुरता) घेवून.तसेच सापांबद्धल प्रबोधन ही करतात.
गारूडी सर्पमित्र- कसाही साप पकडून गाजावाजा(स्टंट) करून कित्येक दिवस स्वतःची हौस भागवण्यासाठी, फोटो काढण्यासाठी त्याला घरी ठेवतात, खेळवतात. आणि साप पकडल्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करतात अन्यथा तिथेच साप सोडून देण्याची भाषा करतात.ज्यामुळे पुढच्या वेळेस लोक सर्पमित्राला बोलवण्यापेक्षा साप मारणे पसंत करतात.
यांच्यामुळेच वनविभागाला चांगल्या सर्पमिंत्राना ओळखपत्र देणे अवघड झाले आहे व कधीकधी प्रामाणिक सर्पमित्रास वन विभागाकडून नकळत त्रास होतो तसेच वनविभागाच्या कडक संहितेमुळे मुळे देखील कित्येक चांगले सर्पमित्र ही सेवा करण्याचे सोडून देत आहेत. याकडे वनविभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सर्पमित्रांमुळेच आज सापांच्या कित्येक जाती जिवंत आहेत, अन्यथा त्या इतिहास जमा होऊन एक मोठी अन्नसाखळी बिघडली असती.
अन्नसाखळी मधील उंदीर व सापाचे एक छोटं गणित – भारतात दरवर्षी जवळपास 25 लाख टन अन्नाची नासाडी उंदरे करतात (एखादया शहराला आरामात पुरेल इतके अन्न). व एक साप वर्षाला 500-600 उंदीर खावून हा वरील आकडा नियंत्रणात ठेवतोय.
आजच्या काळात सापांबद्दल असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा सर्पमित्र दूर करत आहेतच. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम ही मोलाचे आहे. सापांबद्दल असणाऱ्या अंधश्रद्धा व किस्से याविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहीन.
मालोजीराव माने
प्राणीमित्र, पत्रकार 9021515256
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा