Breaking

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

टेंडेंशी बदलत आहे...पण. सौ.आरती लाटणे यांचा विशेष वैचारिक लेख

 

संग्रहित छायाचित्र 

          सहा-सात मुलांना घेऊन आलेल्या ओमनी मधून एक जोडपं उतरलं‌. नकळत त्यांचा संवाद माझ्या कानी पडला, आणि अनेक दिवसापासून मनात घोळत असलेला विचार वास्तवात दिसून आला.

"बाबा, सुट्टी लागल्यापासून फिरायला घेऊन जातो म्हणताय. आणि रोज देवालाच घेऊन जाताय..."

"अरे, आपण कुठे आलो? का आलो? काय आहे येथे? हे जाणून तरी घेत चला."

"काही आम्हाला सांगू नका. आम्हाला नाही काही जाणून घ्यायचं. उद्या तुम्ही गोव्याला न्यायला तर बरं नाहीतर आम्ही कुठेच येणार नाही."

"अरे ऐका तरी..."

"नाही नाही नाही नाही...."

मुलांचा गोंगाट ऐकून शेवटी त्यांच्या बाबांना मुलांच्या पुढे हात टेकावे लागले. आणि एकदाचं त्यांचं गोव्याचे प्लॅनिंग फिक्स झाले. तेव्हा कुठे मुले गाडीत बसली.

माझ्या पुढे चाललेला हा संवाद नकळत माझ्या कानावर पडला आणि मी देखील स्तब्ध झाले. कारण हा सर्व संवाद घडला ते अतिशय पवित्र असं ठिकाण होतं.

     ज्या विभूतीने सर्वसामान्य जनतेला कर्मकांडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या कर्मात, सत्वशील वागण्यात आणि स्वावलंबी जीवन जगण्यात परमेश्वर आहे हे दाखवून देण्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला.  त्या ग्रंथाची सुरुवात नेवासे मध्ये झाली असे हे पवित्र ठिकाण. 

    माझ्यासमोर घडलेल्या संवादातील कुठल्याच व्यक्तीचा दोष नसावा कदाचित. कारण हल्ली जसं फास्ट फूड आलं त्याप्रमाणे जीवन देखील शॉर्ट बट स्वीट झालं. प्रत्येक जण स्वतःपुरता आनंद कशात मिळेल याचा शोध आहे. मान्य आहे सुट्टीचा दिवस मनोरंजन, आत्मिक समाधान मिळवण्यासाठी स्वच्छंदी असावा. याचा अर्थ असा नव्हे की मुलांच्या पुढे कुठलाच आदर्श नसावा. 

     मुलांना शिवरायांचं कार्य कळलं पाहिजे हा जेव्हा अट्टाहास आपला असतो तेव्हा गड किल्ले पाहिल्याशिवाय शिवरायांचा पराक्रम मुलांना कसा कळेल? आपण अनेक संतांची, समाजसुधारकांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतो. कधीतरी त्या पवित्र ठिकाणाला भेट दिली तर मुलांच्या पुढे त्यांच्या कार्याचा आदर्श नाही का राहणार! डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राष्ट्रपती मुर्मू, इ. यांसारखे अनेक आदर्श जिथे निर्माण झाल्या त्या शाळा विद्यार्थ्यांना दाखवल्यास तोही एक आदर्श मुलांच्या पुढे राहिल. 

     मान्य आहे आई-वडील , आजी-आजोबा यांना वर्षातून कधीतरीच मुक्त वेळ मिळतो ज्यावेळी ते पर्यटनाला भेट देऊ शकतात. परंतु सुट्टी म्हणजे पर्यटन हेच सूत्र मुलांच्या पुढे तयार होत आहे. मग प्रश्न पडतो नवीन काही शिकण्याची उमेद आणि नवीन काही घडण्याची वेळ निघून जात तर नाही ना? 


सौ आरती लाटणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा