Breaking

सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

*आभासी चलनाचे भविष्यकालीन धोके ओळखून त्यामध्ये गुंतवणूक करणे काळाची गरज : प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे यांचे प्रतिपादन*


वाघोली येथे सुयेक व्याख्यानमालेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे व अन्य मान्यवर


*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*

  

कोरेगाव : वाघोली येथील शंकरराव जगताप कला व वाणिज्य महाविद्यालय वाघोली ता.कोरेगाव जि.सातारा याठिकाणी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक) आणि शंकरराव जगताप कला व वाणिज्य महाविद्यालय वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष व्याख्यानमालेतील १७ वे पुष्प प्रो.(डॉ.) अनिलकुमार वावरे यांनी गुंफले.  

    कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलाने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.राजुखान पठाण यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकतेतून शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनची भूमिका सांगून आभासी चलनाचे  महत्व का वाढत आहे यासंदर्भातील माहिती विशद केली. अर्थशास्त्र विभागातील प्रा.रविंद्र कारंडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.


     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा अधिष्ठाता, मानव्यविद्याशाखा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा आणि उपप्राचार्य छ.शिवाजी कॉलेज सातारा येथील  प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे यांनी “आभासी चलन व बदलते युग” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना सुरवातीला वस्तूची विनिमयपद्धती कशी होती आणि त्यांनतर मग पैशाचा उगम कसा झाला आणि २००९ पासून जगात ज्या चलनाने सध्या थैमान घातले आहे अशा आभासी चलनाचा जन्म कसा झाला, आज त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि आपण नेमके कोठे जाणार आहोत यासंदर्भात मार्गदर्शन केले. पुढे ते म्हणाले कि, ब्लॉगचैन टेक्नोलॉजी काय आहे, हे तंत्रज्ञान काम कसे करते, पैसाच नसेल तर आपले व्यवहार कसे चालणार, मग अशावेळी पैसाविरहित अर्थव्यवस्थेकडे कसे जाणार? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह करून आज ग्रामीण भागातील काही लोक सुद्धा बीटकॉइन, शेअरमार्केट मध्ये गुंतवणूक करत असेलेले दिसून येत आहेत. बीटकॉइनचा प्रवास कसा सुरु झाला आणि त्याचे भवितव्य काय असणार आहे यासंदर्भात माहिती दिली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर व्यवहार वाढू लागले आणि हे व्यवहार पूर्ण करण्यास नाणी असमर्थ ठरू लागली आणि त्यामधूनच मग नोटांचा जन्म झाला. आज इलेक्ट्रोनिक व्यवहार किंवा ऑनलाइन व्यवहार वाढत असल्याने आपण रोख पैशाचा वापर न करता जगातील कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो यालाच डिजिटल क्रांती असे म्हंटले जाते. बिटकॉइनचे महत्व किंवा बिटकॉइन कशा पद्धतीने काम करते याची माहिती देताना काही जगातील उदाहरणे देवून बिटकॉइनची माहिती दिली. ऑनलाइन व्यवहार होत असताना हे व्यवहार लिक होवू नयेत म्हणून संगणकाची कोडभाषा वापरली जाते त्यालाच क्रिपटोग्राफी असे म्हणतात म्हणजेच बिटकॉइन हे क्रिपटोग्राफी तंत्रज्ञानावर आधारलेले आहे म्हणूनच त्याला क्रिपटोकरन्सी असे म्हणतात.तसेच ब्लॉगचैन टेक्नोलॉजी काय आहे? हे सर्व व्यवहार होतात पण ते दिसत नाहीत, यामधून वस्तूंच्या किंमती वाढतील, यावर नियंत्रण कसे ठेवायचे हा प्रश्न जगासमोर आला असून त्यामधूनच नकली बिटकॉइन निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रक्रियेतून भारताचा  प्रवास सुरु झाला आहे त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे समजून घेवूनच ही प्रक्रिया स्वीकारावी असे मत डॉ.वावरे यांनी आपल्या मनोगतातून सांगोपांग पद्धतीने माहिती विशद केली.

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.युवराज गोंडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आभासी स्वरूप आणि संकल्पना सध्याच्या पिढीला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे,आभासी चलनामुळे जागतिक आर्थिक व्यवहारावर दूरगामी असा परिणाम होणार आहेत आणि म्हणूनच सुयेकच्या माध्यमातून यासारख्या ज्वलंत विषयावर जाणीवजागृती हाती घेतल्याबद्दल सुयेक संस्थेचे आभार मानले. 

सदर कार्यक्रमासाठी शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक) चे कार्यवाह खजिनदार डॉ.संजय धोंडे, कार्यकारणी सदस्य डॉ.रमजान मुजावर, डॉ.राणी शिंदे उपस्थित होते.     

    विशेष म्हणजे याप्रसंगी  शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन, कोल्हापूर (सुयेक) आणि शंकरराव जगताप कला व वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथील अर्थशास्त्र विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्रा.रुपेश टंकसाळे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन,कोल्हापूर (सुयेक) चे कार्यवाह खजिनदार डॉ.संजय धोंडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा