Breaking

शुक्रवार, १७ जुलै, २०२६

*कौशल्य विकास हाच आत्मनिर्भर व विकसित राष्ट्राचा पाया : प्रा. संजय ठिगळे*

 

 प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना अर्थशास्त्र अभ्यासक प्रा. संजय ठिगळे, प्राचार्य डॉ. माधुरी शिंदे व अन्य मान्यवर

*प्रा. डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


सातारा (देऊर) : भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर व विकसित राष्ट्र निर्मितीसाठी युवकांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक, डिजिटल व व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सांगलीचे ज्येष्ठ लेखक व अर्थशास्त्र अभ्यासक प्रा. संजय ठिगळे यांनी केले.

   संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर येथील अर्थशास्त्र विभाग आणि शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनॉमिक्स असोसिएशन (सुयेक), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020), कौशल्य विकास आणि विकसित भारत २०४७ : युवांसाठी संधी व आव्हाने" या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

        प्रा. ठिगळे म्हणाले, २१ व्या शतकात भारताला महासत्ता बनविण्याचा मार्ग कौशल्याधारित शिक्षणातूनच जातो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेले कौशल्य ओळखून ते विकसित करण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेतील सर्व घटकांनी पार पाडली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी-केंद्रित असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. माधुरी शिंदे होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन, कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेला प्राधान्य द्यावे, तसेच नोकरी शोधणारे न बनता रोजगारनिर्माते व उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन केले. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देईल, असेही त्यांनी सांगितले.

      प्रारंभी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय शेडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार डॉ. मनीषा पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. सुंदर पोटभरे  यांनी केले. 

       कार्यक्रमास संवेदनशील लेखिका  सुवर्णा ठिगळे,  प्राध्यापकवृंद, अर्थशास्त्र प्रेमी श्रोते व  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा