Breaking

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

*संवेदनशील कार्यकर्ते सुरेश गजानन सकटे यांना अमेरिकेतील मानद डॉक्टरेट*



*प्रा. डॉ. प्रभाकर माने  : मुख्य संपादक*


सांगली : साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, सामाजिक बांधिलकी आणि समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या व्यापक कार्याची दखल घेत सांगली येथील अखिल भारतीय सारस्वत मंडळाचे अध्यक्ष तथा संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गजानन सकटे यांना अमेरिकेतील लुईझियाना विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट हा सन्मान पुणे येथे  प्रदान करण्यात आला आहे.व्यसनमुक्ती प्रचार -प्रसार व प्रबोधन, युवक कल्याण ,महिला सबलीकरण, यामधील कामाची दखल घेऊन विद्यापीठाने हा सन्मान त्यांना बहाल केला. याप्रसंगी संगीता सकटे व ऋचा सकटे उपस्थित होते.

     सुरेश सकटे यांनी साहित्य क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करण्याबरोबरच समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य हे प्रभावी माध्यम ठरू शकते, या भूमिकेतून त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

          विशेषतः समाजातील वाढत्या व्यसनाधीनते विरोधात त्यांनी उभारलेली व्यसनमुक्तीची चळवळ उल्लेखनीय ठरली आहे. व्यसनामुळे व्यक्ती, कुटुंब आणि संपूर्ण समाजावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्यांनी व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सातत्याने जनजागृती केली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवणे, तरुण पिढीमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांनी निरोगी व विधायक जीवनशैली स्वीकारावी, यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत.

      विद्यार्थिदशेतच योग्य संस्कार, सामाजिक जाणीव आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व रुजले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपले कार्य पुढे नेले आहे. केवळ व्यसनमुक्तीपुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणे, समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणे तसेच सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे, अशा विविध पातळ्यांवर त्यांचे कार्य सुरू आहे.

       सुरेश सकटे यांना अमेरिकेतील लुईझियाना विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्राप्त झाल्याने सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा