![]() |
| प्रा. किरण संपत पाटील व मार्गदर्शक प्रा. डॉ. पी. एन. गोरे |
*प्रा. डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : येथील जयसिंगपूर कॉलेजच्या इंग्रजी विभागात कार्यरत असलेले प्रा.किरण सुशीला संपत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांच्या संशोधनाचा विषय "Migration, Cultural Displacement and Alienation in the Select Novels of Alex Miller' असा होता. या संशोधनामध्ये ऑस्ट्रेलियन साहित्यिक अॅलेक्स मिलर यांच्या निवडक कादंबऱ्यांचा स्थलांतर, सांस्कृतिक विस्थापन आणि परकेपणा या संकल्पनांच्या अनुषंगाने चिकित्सक व सखोल अभ्यास करण्यात आला आहे. या संशोधनासाठी त्यांना कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी. एन. गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करीत कष्टमय जीवन जगणारे शेतकरी श्री. संपत गोविंद पाटील व सौ. सुशीला संपत पाटील यांच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि शेतकरी कुटुंबातून मिळालेले कृषी संस्कार हेच त्यांच्या जीवनाचे खरे भांडवल ठरले. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करीत त्यांनी बालपणापासूनच आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली. सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कुमठे हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, कुमठे येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, कुमठे येथे पूर्ण झाले. उच्च शिक्षणाची वाटचाल करताना त्यांनी श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथून पदव्युत्तर पदवी संपादन केली. शैक्षणिक गुणवत्ता आणि अभ्यासातील सातत्याच्या बळावर त्यांनी सन २०१४ मध्ये यूजीसी नेट (NET) परीक्षा, तर सन २०१६ मध्ये सेट (SET) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.
प्रा. किरण पाटील यांचा शैक्षणिक आणि अध्यापन क्षेत्रातील प्रवास विविध अनुभवांनी समृद्ध आहे. त्यांनी चाटे ज्युनिअर कॉलेज, सांगली येथे दहा वर्षे अध्यापन सेवा बजावली. त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथेही त्यांनी सेवा दिली. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली येथे पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांना पाच वर्षे मार्गदर्शन केले. घोडावत स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अनेकांत स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. सन २०१५ पासून ते जयसिंगपूर कॉलेजच्या इंग्रजी विभागात अध्यापनाचे कार्य करीत आहेत. गेल्या बारा वर्षांपासून इंग्रजी भाषा, साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते सातत्याने योगदान देत आहेत.
केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. शैक्षणिक चळवळीच्या प्रवासात विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्यांनी लढा उभा केला. उपेक्षित व वंचित समाजघटकांच्या न्याय्य हक्कांसाठी ते सातत्याने जागरूक राहले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. स्वतः रक्तदाता म्हणून कार्य करण्याबरोबरच रक्तदान आणि सामाजिक सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कामही ते करतात. छ.शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्य व विचाराने प्रेरित होऊन समाजकार्यात सहभागी असतात. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी चळवळीत सहभागी असून त्यांच्या कृतिशील विचारांचे ते पाईक आहेत.
व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण कौशल्य आणि स्पर्धा परीक्षा या विषयांवर ते विविध ठिकाणी मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास, आत्मविश्वास वृद्धिंगत करणे आणि त्यांना स्पर्धात्मक जगासाठी सक्षम बनविणे हा त्यांच्या अध्यापनाचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा अवलंब, विषयाची प्रभावी मांडणी आणि विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध यांमुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परिचित आहेत.या कामी इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शशांक माने, डॉ.एस.जी.पाटील व प्रा. शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
पीएच.डी. पदवी संपादणूक करण्याच्या त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ. महावीर अक्कोळे, खजिनदार पद्माकर पाटील,संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा