कोल्हापूर: यंदाच्या साखर हंगामात राज्यात उसाला सर्वाधिक दर मिळाला असून पहिल्या दहा साखर कारखान्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल आठ कारखान्यांचा तर दोन सांगली जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक प्रतिटन ३१७६ रुपये दर सोनहिरा (कडेगांव-सांगली) कारखान्याने दिला आहे तर त्या खालोखाल कोल्हापुरातील कुंभी कासारी कारखान्याने प्रतिटन ३११९ रुपये दर देऊन राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळवले आहे.
दरम्यान, साखर उताऱ्यातही कोल्हापूरने बाजी मारली असून सर्वाधिक साखर उतारा असलेल्या राज्यातील पहिल्या दहा कारखान्यात जिल्ह्याती तब्बल सात कारखान्यांचा समावेश आहे. ‘दत्त-दालमिया’ या खासगी कारखान्याने सहकारी साखर कारखान्याने मागे टाकत यावर्षीच्या हंगामात राज्यात सर्वाधिक १३.३९ टक्के उतारा मिळवला आहे.
उतारा जास्त असलेल्या अन्य कारखान्यात कोल्हापूरच्या पंचगंगा-इचलकरंजी, बिद्री-कागल, ओलम ॲग्रो-चंदगड, मंडलिक-हमीदवाडा, कुंभी-कुडित्रे व गगनबावडा तालुक्यातील डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचा समावेश आहे.यावर्षी राज्यातील १९० कारखान्यांनी हंगाम घेतला होता. या कारखान्यांचा हंगाम काल (ता. २७) संपला. यावर्षी राज्यात १०१२ लाख टन गाळप होऊन १०६.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात २२ कारखान्यांनी १५० लाख ७५ हजार टन ऊस गाळप करून १ कोटी ८२ लाख १७ हजार ८२० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात सर्वाधिक ऊस बिलाची रक्कम अदा केलेल्या पहिल्या दहा कारखान्यात कोल्हापूरातील जवाहर-हुपरी, दत्त-दालमिया, दत्त-शिरोळ व शाहू-कागल या चार कारखान्यांचा समावेश आहे. यातील जवाहर कारखान्याने राज्यात उच्चांकी ५२, ८६८ लाख रुपये ऊस बिलापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. राज्यात सर्वाधिक गाळप, सर्वाधिक साखर उत्पादन, सर्वाधिक साखर उतारा व सर्वाधिक ऊस दर देण्यात कोल्हापूरचेच कारखाने आघाडीवर आहेत.
साखर कारखाना व प्रतिटन दिलेला भाव;
- सांगली सोनहिरा-कडेगाव- ३१७६
- कोल्हापूर कुंभी-कुडित्रे -३११९
- कोल्हापूर बिद्री-कागल- ३०७५
- सांगली निनाईदेवी-शिराळा- ३०५३
- कोल्हापूर पंचगंगा-इचलकरंजी- ३०४०
- कोल्हापूर ओलम-चंदगड- २९८५
- कोल्हापूर शाहू-कागल- २९७२
- कोल्हापूर भोगावती-परिते -२९७२
- कोल्हापूर कोरे-वारणानगर -२९५१
- कोल्हापूर गायकवाड-बांबवडे -२९००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा