Breaking

शनिवार, २९ मे, २०२१

आई वृध्दाश्रमातील वृध्दांचे मृत्यूनंतरचे प्रेत कोणी दत्तक घेता का..? दत्तक..?

 




       आई वृध्दाश्रमातील वृध्दांची आम्ही तन , मन व धन अर्पण करून मनापासून सेवा करीत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशिर्वादाने घरच्या पेक्षा सरस अन्न आणि वृध्दांच्या भौतिक गरजा आपण सर्वजण मिळूनन भागवित आहात. पण... आई वृध्दाश्रमातील वृध्दांची मृत्यूनंतरची परवड सुरू आहे. अत्यंविधीच्या खर्चासाठी आमच्या समोर अडचडी निर्माण होत आहेत. 

          कोरोना महामारीमुळे आई वृद्धाश्रम समोर असंख्य प्रश्न आ वाचून उभे आहेत. तरीही यातूनही मार्ग काढत आपल्या संवेदनशीलतेमुळे आई वृद्धाश्रमाचा गाडा चालवित आहोत.मात्र वृध्दाश्रमात दाखल असणा-या सर्वच वृध्दांचा मुलगा म्हणून मीच त्यांना शेवटची मुठमाती द्यावी अशी सर्वांची ईच्छा आहे. पण... मरण आता खुपचं महाग झालं आहे. वृध्दाश्रमाला ते न झेपणारं आणि  न परवडणारं आहे. छोट्या मोठ्या देणगीतून आणि माझ्या प्रयत्नातून वृध्दाश्रमाचे भाडे व लाईटबिल याची तजविज करतांनाच मोठ्या दिव्यातुन जावे लागत आहे. हे ठिक आहे. पण वृध्दाश्रमात होणा-या मयताच्या प्रेताची परवड आणि हेळसांड होऊ नये . ही आमची प्रामाणिक ईच्छा आहे. 

        आम्ही अत्यंविधीसाठी कोणाकडूनही एक रूपया स्विकारणार नाही. पण प्रेत जाळण्यासाठी पुरेशी लाकडे मिळावीत त्याची तजवीज व्हावी हीच एक प्रामाणिक ईच्छा आहे.आमच्या आई वृध्दाश्रमातील  एक आजी गेल्या महिन्याभरा पासून सांगली सिव्हिल हाॅस्पिटल येथे ॲडमिट असून त्या खूप सिरीयस आहेत. त्यांचं देखील कधी काय होईल हे सांगता येत नाही. 

           तरी समाजातील दानशुर व्यक्ती , सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्था  यांनी आई वृध्दाश्रमातील वृध्दांच्या अंत्यविधीसाठी लागणा-या पुरेशा लाकडांची ज्या त्या वेळी सोय करावी. आणि मृतांची होणारी परवड थांबवावी.दोन महिन्यांपुर्वी आई वृध्दाश्रमातील मयत आजोबांचे प्रेत सांगली स्मशानभुमीतील विद्युतवाहिनीला देण्याची नामुष्की आमच्यावर ओढविली होती. तसेच दोन दिवसांपुर्वी वृध्दाश्रमातील मयत आजींच्यावर इचलकरंजी येथील स्मशानभुमीत २५० रूपयांमध्ये अत्यविधी झाला होता.       

       पण...जयसिंगपुर नगरपालिका हद्दीतील अनाथ , निराधार , बेवारस , वृध्दाश्रम आणि अनाथाश्रमातील प्रेतांना कोणी वालीच उरला नाही या निमित्ताने व संवेदनशीलतेच्या भावनेने म्हणावे लागत आहे.

        आई वृध्दाश्रमातील वृध्दांच्या अत्यंविधीसाठी स्मशानभुमीतील महागड्या लाकडांसाठी प्रेत दत्तक द्यावं लागणं ही आमच्यासाठी खूपच दुदैवाची आणि वेदनादायी गोष्ट आहे.


 संजय भोसले, अध्यक्ष

आई वृध्दाश्रम , जयसिंगपूर

ता.शिरोळ जि. कोल्हापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा