Breaking

शुक्रवार, २१ मे, २०२१

"प्रेरणादायी ! कोरोना परिस्थितीत तरुणाईला लाजवेल असे काम"

 


   कोरोना महामारीच्या काळात सातत्याने वास्तवादी नकारात्मक बातम्या ऐकून लोकांची निराशावादी मानसिकता तयार झाली आहे. अशावेळी फिरून साबण विक्री करणाऱ्या एका वृद्धाची प्रेरणादायी वस्तुस्थिती आपल्या समोर मांडत आहे.

       जयसिंगपूर शहरातील ७८ वयाची ही वृद्ध व्यक्ती नेहमीच साबणाची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवित आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू म्हणजे चेहऱ्यावर प्रसन्नता, कुटुंबासाठी उत्पन्न मिळवण्याची धडपड, अत्यंत चिकाटी व  काटकपणा  हे असून त्यांच्या चालण्या व वागण्यातून ते दिसून येत आहे.

      मुळात हाजीसाब मिरजे असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून सकाळी ७.०० वाजल्यापासून ते  १०.०० वाजेपर्यंत कपडे व धुण्याच्या साबणाची विक्री सायकलवरून नित्यनियमाने करीत असतात. या कोरोना प्रादुर्भावाचा गंभीर परिस्थिती असताना मृत्यूवर मात करीत जगणं खूप महत्वाचा आहे  या वयातही कुटुंबाला हातभार लागावा या हेतूने ते काम करीत आहेत.

     मी स्वतः या वृद्ध व्यक्तीला काहीतरी आर्थिक मदत व्हावी म्हणून जाणीवपूर्वक त्यांच्याकडून साबण खरेदी केले.  त्यानंतर त्यांना दिनक्रम व कुटुंबाची  माहिती विचारताच ते सांगू लागले की, स्वतःची शेती व जनावरांच्या बरोबर जीवनरुपी संसाराचा गाडा ओढत हा माझा प्रवास आहे. माझ्या कुटुंबात  पत्नी, दोन मुले व नातवंडे असून आम्ही सर्वांनी कोरोनाची परिस्थिती व सत्यता  आनंदाने स्वीकारली आहे. कारण प्रत्येक जण आपापली जबाबदारी ओळखून आपले काम पार पाडीत आहे. मला स्वतःला कामाची आवड व कुटुंबाला हातभार लावण्याची इच्छा असल्यामुळे साबण विक्रीचे काम आनंदाने करीत असतो. 

   परंतु कोरोना महामारीच्या या काळात दुःखद व भयावह वातावरण आहे हे आपण सर्वांनी मान्य करावं. परंतु त्यातून मार्ग काढण्यासाठी मी  कोरोना नियमांचं पालन करून तोंडाला मास्क लावणे,हात सनीटाइज व सामाजिक अंतराचे पालन करीत असतो. दररोज साबण विक्रीपासून  ४०० ते ५०० रुपयांची कमाई करतो. त्यानंतर घरी जाऊन आंघोळ करून जेवण करतो व विश्रांती घेतो. 

     माझे स्वतःचे मत असे आहे की, कोरोना महामारीचा प्रश्नाविषयी सातत्याने रडत बसण्यापेक्षा यावर तोडगा काढणे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोरोना महामारीचा विषय एका बाजूला व जीवन जगण्यासाठी प्रश्न दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा विषय डोक्यात घेऊन मी माझी दिनचर्या चालवीत असतो.  मला कुठेही अडचण येत नाही कारण कोरोना महामारीचा प्रश्न आता अंगवळणी पडला आहे. त्यामुळे मी सर्व नागरिकांना तसेच तरुणांना आव्हान करतो की, नकारात्मक मानसिकते पेक्षा सकारात्मक विचार करून जीवन जगण्यासाठी काहीतरी चांगला तोडगा काढावा व सत्य परिस्थितीला सामोरे जाऊन आनंदी जीवन जगावे.


प्रा.डॉ. प्रभाकर तानाजी माने

मुख्य संपादक,

जय हिंद डिजिटल न्यूज पोर्टल

३ टिप्पण्या: