नाशिक: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याजिल्ह्यात मूक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं जात आहे. आज नाशिक येथील लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. त्यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बैठक व्यवस्थेवरून जोरदार गोंधळ झाला. संभाजीराजेंनी हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केलं.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ देखील आंदोलन स्थळी पोहोचले. त्यावेळी त्यांना बसायला खुर्ची देण्यात आली. त्यावरून मराठा आंदोलक आक्रमक झाले. काही वेळ जोरदार गोंधळ झाला. संभाजीराजे खाली बसले असताना भुजबळांना खुर्ची दिली गेल्यामुळं संताप व्यक्त करण्यात आला. मात्र, संभाजीराजेंनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केलं. भुजबळ हे जेष्ठ नेते आहेत. त्यांना खाली बसायला अडचण आहे. त्यामुळं त्यांना खुर्चीवर बसू द्या, असं आवाहन संभाजीराजेंनी केलं. त्यानंतर वाद मिटला. छगन भुजबळ यांनी देखील आंदोलन स्थळी मनोगत व्यक्त करताना त्याबद्दल खुलासा केला. मला पाठीचा त्रास असल्यानं मी खुर्चीवर बसलो होतो,' असं ते म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले...
'मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमत नाही. सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मिळायला हवं ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे,' असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं. 'छगन भुजबळ आपला दुश्मन आहे असा प्रचार केला जातो. पण विधानसभेतही मी मराठा आरक्षण विषयाला पाठिंबा दिलाय. निवडणूक आली की ओबीसी, मराठा असा अपप्रचार केला जातो. आपला लढा व्यवस्थेशी आहे. चर्चेशिवाय मार्ग नाही. एकत्र येऊन लढूया,' असं आवाहन भुजबळ यांनी यावेळी केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा