आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना संकट काळात योग हा आशेचा किरण असल्याचं म्हटलं. यासोबतच भारतानं जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) मिळून तयार केलेल्या M-Yoga App चं मोदींनी लाँचिंग केलं.
M-Yoga App च्या माध्यमातून जगभरातील लोकांना वेगवेगळ्या भाषेत योगा शिकता येणार आहे. "जगाला आता M-Yoga App ची ताकद मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षण योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतील. भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबत मिळून एक महत्वाचं पाऊल उचललं आहे", असं मोदींनी यावेळी म्हटलं.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, योगाची माहिती फ्रेंच, इंग्रजी, हिंदीसह संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. अॅप पूर्णपणे सुरक्षित असून युझरचा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. १२ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा