Breaking

गुरुवार, २४ जून, २०२१

"जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या एका स्वयंसेवक विद्यार्थ्यांची कोरोना काळात उच्चकोटीची मानवसेवा"

 

मंथन महिंद, NSS स्वयंसेवक


प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


   जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वितीय वर्षातील स्वयंसेवक विद्यार्थी मंथन चंद्रकांत महिंद यांनी आधार रेस्क्यू टीमचा एक घटक व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक विद्यार्थी  म्हणून कोरोना महामारी काळात समाजाला अभिमान वाटावा अशी उच्च कोटीची मानवसेवा केली आहे.

      गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी या देशातील कोरोना योद्धे कोणत्याना कोणत्या प्रकारे राष्ट्रीय मानव सेवा करीत आहे. त्याचबरोबर ही सेवा तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या माध्यमातून 'माझं गाव- कोरोनामुक्त गाव' ही मोहिम सुरू केली असून त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डीटी.शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अभय जायभाये,संचालक,रासेयो, कक्ष यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यक्रम अधिकारी व समस्त स्वयंसेवक विद्यार्थी आपल्या परीने कोरोना मुक्तीसाठी योगदान देत आहेत. याच पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कॉलेजच्या या विद्यार्थ्याने शिरोळ तालुक्यातील नांदणी,हरोली,जांभळी,टाकवडे, शिरढोण,हसुर,कवठेसार तसेच हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे लॉकडाउनच्या काळात बंदोबस्ताच्या माध्यमातून मास्क व सैनिटायझर वापर करण्यासंदर्भात या गावातील घटकांचे प्रबोधन करून अपार सेवा दिली.


      देशातील वास्तवता अशी आहे की, एकीकडे कुटुंबातील सदस्य covid-19 मुळे मयत झाल्यानंतर त्याच्या दहन क्रियेला उपस्थित न राहणारे लोक या कोरोना काळात दिसले.पण याच कोरोना काळात या विद्यार्थ्याने covid-19 मुळे मयत झालेल्या टाकवडे या गावातील २ मृतदेह व चंदुर येथील एका मृतदेहाचे दहन करण्याचं काम वयाच्या २१ व्या वर्षी करणे हे खरोखरच धाडसी,अपार व उच्च  कोटीची मानवी सेवेचे दर्शन घडविणारे आहे. एकीकडे तरुणाईकडे नकारात्मक दृष्टीने पाहत असताना या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्याने संस्कारक्षम व संवेदनशीलता दाखवून दिली आहे.




     इतक्या लहान वयात ही वैचारिक समज, सामाजिक बांधिलकी व देशसेवा याबद्दल मंथन महिंद यांना विचारले असता ते म्हणाले की, घरात मिळालेले संस्कार व राष्ट्रीय सेवा योजनेपासून मिळालेली देश सेवेची प्रेरणा यामुळे हे शक्य झाले.आजही तो अहोरात्रपणे मानवतावादी सेवा करण्यास मी कटिबद्ध असल्याचे तो सांगतो. यावरून त्याच्या प्रत्येक क्रियेत  सेवाभावी वृत्ती ठासून भरली असल्याचे दिसून येते.



      या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांने केलेल्या कार्याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. त्याच्या या कार्यास जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य, डॉ.राजेंद्र कुंभार व कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आहे.

1 टिप्पणी: