Breaking

शनिवार, १९ जून, २०२१

"राहुल गांधींना वाढदिवसानिमित्त संजय राऊतनी राष्ट्रीय राजकारणात मोठे नेते होण्याची दिल्या भरभरून शुभेच्छा"



   मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून पक्षाची बांधणी वेगाने होवो, देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान बळकट होवो, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त  खासदार संजय राऊत यांनी, सेना यापुढे देशाच्या राजकारणात प्रखरतेने दिसेल असं सांगितलं. “जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेला लोक म्हणत होते की शिवसेना मुंबई-ठाण्याच्या पुढे जाणार नाही. पण शिवसेना महाराष्ट्रभर पसरली, आता महाराष्ट्राच्या सीमा पार करून दिल्लीपर्यंत पोहोचली आहे”

   शिवसेनेच्या आधी आलेले आणि नंतर आलेले राजकीय पक्ष हे काळाच्या ओघात नष्ट झाले. आजही शिवसेना पुढे जाते आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर. मराठी माणसाचा विषय शिवसेनेने कधीच दूर होऊ दिला नाही, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना आपली वाटते. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहेत. आज हिंदुत्व म्हटलं की शिवसेना, असंही संजय राऊत म्हणाले.

       शिवसेना हा मोठा चमत्कार

एक छोटं संघटन म्हणून शिवसेनेची सुरवात झाली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारं हे संघटन आहे. त्यामुळे मुंबईच्या पुढे जाणार नाही, शिवसेनेची धाव पालिकेपर्यंत राहील असं भाकीत केलं गेलं. पण आज शिवसेनेचा राज्यात मुख्यमंत्री आहे. किती आले आणि गेले, शिवसेना कायम आहे. शिवसेनेचा विचार कायम आहे. भारताच्या राजकारणात शिवसेना हा मोठा चमत्कार आहे, असं ते म्हणाले.

    शिवसेना प्रखरतेने राष्ट्रीय राजकारणात दिसेल

देशाच्या राजकारणात आपला विचार, आपली भूमिका कायम राहील. भविष्यात आज पेक्षाही जास्त प्रखरतेने शिवसेना राष्ट्रीय राजकारणात दिसेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे कडवं बहुतेक शिवसेनेच्या भविष्यासाठी लिहिलं असावं. दिल्लीचे तख्त राखतो यांना शिवसेनेचा विचार यापुढे महत्त्वाचा राहणार आहे.

   राहुल गांधींना शुभेच्छा

राहुल गांधी देशाचे प्रमुख नेते आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून पक्षाची बांधणी वेगाने होवो, देशाच्या राजकारणातील त्यांचं स्थान बळकट होवो, असं संजय राऊत म्हणाले. राहुल गांधी हे प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व आहे, देशाप्रती भावना चांगली आहे, येत्या काळात त्यांचं नेतृत्व नव्याने उभं राहील, असं संजय राऊत म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा