Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

" *शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या(सुटा)वतीने कोरोना काळात दिवंगत झालेल्या प्राध्यापकांना अभिवादन करण्यासाठी ऑनलाइन शोकसभेचे आयोजन*"






प्रा.डॉ. प्रभाकर माने / प्रमुख संपादक:


     शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटना अर्थात सुटाच्या वतीने अनोख्या पद्धतीने कोरोना काळात कोरोना किंवा अन्य कारणामुळे मयत झालेल्या प्राध्यापकांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

        सुरुवातीस सुटाचे प्रमुख कार्यवाह प्रा.डॉ.डी.एन.पाटील यांनी  शोकसभाआयोजनाचा हेतू स्पष्ट करताना म्हणाले की,  दुःखद पार्श्वभूमी असलेली ही बैठक असून  आर्थिकहानी बरोबर प्राध्यापकांच्या रूपाने जीवितहानी ही खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे.कोरोना काळात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या प्राध्यापकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करू शकलो नाही. त्यामुळे दिवंगत झालेल्या प्राध्यापकाविषयी शोक व्यक्त करणे व त्यांच्या कुटुंबियांना नैतिक व मानसिक आधार देऊन सांत्वन करणे असा या संवेदना सभेचा हेतू होता.

      प्रारंभिक सोलापूर जिल्ह्याचे सुटा अध्यक्ष प्रा.डॉ.हणमंत अवताडे यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मयत झालेल्या सुटा सोलापूरचे प्रमुख कार्यवाह कै .प्रा.डॉ.राणू कदम व अन्य प्राध्यापकांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्याविषयी मनोभावे शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

 सांगली जिल्ह्यात कोरोना व अन्य घटनेमुळे मयत झालेल्या प्राध्यापकांचा शोकसंदेश देत त्यांना विनम्रपणे श्रद्धांजली वाहिण्यात आली. या शोकसभेत प्रा.डॉ. उल्हास माळकर,प्रा.डॉ.नरेंद्र कुलकर्णी, प्रा.डॉ.पी.ई.जाधव व प्रा.डॉ.आर.के. चव्हाण यांनी शोक संदेश देऊन दिवंगत प्राध्यापकाना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

     सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मयत झालेल्या प्राध्यापकांच्या भूतकालीन कार्याला उजाळा देत त्यांच्याविषयी शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.एस.डी.कणसे,प्रा.डॉ. सुनील सावंत,प्रा.डॉ.अनिल टिके,प्रा.डॉ. संतोष कदम,प्रा.डॉ.राजेंद्र देशमुख,प्रा.डॉ.नंदकुमार धनवडे, प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार व प्राचार्य डॉ.सतिश घाडगे यांनी हळहळ व्यक्त करीत शोकसंदेश दिला.

         कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कोरोना साथीमुळे कालवश झालेल्या प्राध्यापकांच्या वैचारिक व कृतिशील कार्याची सांगोपांग चर्चा करून शोकसंदेशात त्यांच्या कार्याला सलाम करून मनस्वी अभिवादन करण्यात आले. यामध्ये प्रा.डॉ.प्रभाकर माने,प्रा.डॉ. गोपाल दिवेकर,प्रा.डॉ. गजानन भोसले,प्रा.डॉ. राजेश घोरपडे,प्रा.आर.बी.तेली,

प्रा.डॉ. अमृत मगदूम,प्रा.डॉ.संतोष जेठीथोर,प्रा.डॉ.एन.डी. पाटील,प्रा.डॉ. किशोर अदाते,प्रा.डॉ. बाजीराव कांबळे,प्रा.डॉ.अरुण शिंदे इ. सर्वांनी अनुभव कथन करीत संवेदना व्यक्त केल्या.

     खरं म्हणजे सुटाच्या वतीने आयोजित केलेली ही शोकसभा  म्हणजे एक प्रकारे न तुटणाऱ्या भावनांचा बंध,काळजाला हात घालणारे शब्द, भावनेला मनाचा संवेदनशील स्पर्श,डोळ्यातील न सुकणारा ओलावा,भरून न येणारी  बौद्धिक व वैचारिक पोकळी या शोक संदेशाच्या माध्यमातून पुढे आली. जवळपास २ तास ३५ मिनिटे इतकी दीर्घकाळ ही शोकसभा ऑनलाइन पद्धतीने चालली होती.

       सरतेशेवटी, सुटाचे सांगली, कोल्हापूर व साताराचे समन्वयक अनुक्रमे प्रा.टी.व्ही.स्वामी,प्रा.डॉ. सुधाकर मानकर व प्रा.ए.पी.देसाई हे शोकसभेत संवेदना व्यक्त करताना  म्हणाले की, आमच्या आयुष्यात इतक्या मोठ्या प्रमाणात प्राध्यापक दिवंगत होणे हे पहिल्यांदाच होत आहे . प्राध्यापकांचे अकाली जाणे खूप दुःखदायक आहे. हे दुःख शब्दात व्यक्त करणे कठीण होत आहे.

        या शोकसभेचेच्या शेवटच्या टप्प्यात दिवंगत प्राध्यापक व त्यांच्या कुटुंबीयाविषयी संवेदना व्यक्त करताना सुटाचे अध्यक्ष प्रा.डॉ.आर.के.चव्हाण म्हणाले की, या शोकसभेच्या माध्यमातून सुटा संघटना व प्राध्यापक यांच्या मधील नातेसंबंध व भावनिक ऋणानुबंध वृद्धिगत झाले आहेत. प्राध्यापक सेवेत असताना व त्यांच्या दुःखद निधनानंतर सुद्धा संघटना आपल्या सभासदांच्या कुटूंबियांची काळजी घेते . 

TBF चे सचिव डॉ. मनोज गुजर यांनी दुःख व्यक्त करीत प्राध्यापकांच्या हितार्थ व कल्याणासाठी टीचर बिनोव्होल्ट फंडाचे (TBF) सभासद वाढविण्याचे आवाहन केले. तसेच मयत सभासदांच्या कुटूंबियांना केलेल्या आर्थिक मदतीची माहिती दिली .

      या शोकसभेचे आभार सुटा मध्यवर्तीचे खजिनदार प्रा.डॉ. अरुण शिंदे यांनी व्यक्त करून या शोक प्रस्तावाच्या माध्यमातून सुटा संघटना ही प्राध्यापकांच्या हितार्थ कार्य करते हे सिद्ध झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या शोकसभेत कोल्हापूर,सांगली व सातारा या जिल्ह्यातील शेकडो प्राध्यापक ऑनलाइन सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा