![]() |
प्रसिद्ध लेखिका, उषाताई पत्की |
प्रसिद्ध लेखक , प्रसाद माधव कुलकर्णी, समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९०)
उषाताई यशवंतराव पत्की वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी सोमवार ता. २८ जून २०२१ रोजी कालवश झाल्या. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या उषाताई निवृत्त मुख्याध्यापिका होत्या. सांगली येथील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा या विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मराठी,भूगोल व हस्तकला या विषयांच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.त्यांच्या पश्चात दोन भाऊ व त्यांची मुले असा परिवार आहे.
उषाताई समाजवादी प्रबोधिनीच्या हितचिंतक होत्या. ख्यातनाम विचारवंत लेखिका आणि प्रबोधिनीच्या स्थापनेपासूनच्या ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक प्रा.डॉ. तारा भवाळकर आणि उषाताई या भगिनी गेले अर्धशतकाहून अधिक वर्षे सहनिवासीनी होत्या .मूळच्या नाशिककर असलेल्या ताराबाई नोकरीच्या निमित्ताने १९६७ च्या दरम्यान सांगलीला आल्या.त्यापाठोपाठ नाशिककर उषाताईही सांगलीला आल्या.डॉ.तारा भवाळकर या मराठी साहित्य,लोकसाहित्य,लोकसंस्कृती, लोकचळवळ, नाटक,ललितकला या विविध क्षेत्रातील दिग्गज विदुषी आहेत .त्यांच्या समग्र वाटचालीच्या सर्वात जवळच्या साक्षीदार,सहकारी उषाताई होत्या.उषाताईच एक स्वतंत्र व्यक्तीमत्व होत.त्यांचाही लोकसंग्रह मोठा होता. अतिशय लोभस असं त्यांच व्यक्तिमत्त्व होतं.आदर्श शिक्षिका,मुख्याध्यापिका म्हणून काम करत असतानाच त्यांनी भरतकाम, विणकाम , पाककला, वाचन असे विविध छंद जोपासले होते.गेल्या काही वर्षात पायाच्या झालेल्या ऑपरेशनमुळे हातात काठी आली तरी उषाताईंचा उत्साह कमी झाला नव्हता.टापटीप व व्यवस्थितपणा हा त्यांच्या व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग होता.
उषाताईनी २०१५ च्या ऑक्टोबरमध्ये वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केल्यावर समाजवादी प्रबोधिनीला तब्बल एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यातून दरवर्षी एक महिला विषयक कार्यक्रम आयोजित केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.एका निवृत्त शिक्षिकेने एक लाख रुपयांची देणगी प्रबोधन कार्याला देणे ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट होती.ती समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यावरील विश्वास व वैचारिक बांधिलकीची पोचपावती होती. समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. एन डी पाटील यांच्या हस्ते उषाताईंचा सत्कारही इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात केला होता. प्रारंभी त्या सत्काराला तयार नव्हत्या पण अशी बांधिलकी जपणारी माणसे समाजासमोर आली पाहिजेत या माझ्या आग्रहामुळे त्या तयार झाल्या.त्यांच्या देणगीतून इचलकरंजी ,सांगली, जयसिंगपूर आदी ठिकाणी गेली पाच वर्षे आपण कार्यक्रम घेतले. या सर्व कार्यक्रमांना उषाताईंची उपस्थिती होती. गतवर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. म्हणून तो यावर्षी अधिक मोठ्या प्रमाणात करावा असा मानस असतानाच कोरोनानेच उषाताई कालवश व्हाव्यात ही अतिशय दुःखद घटना आहे.गेल्या पस्तीस वर्षातील उषाताईंच्या असंख्य आठवणीं आज दाटून येत आहेत.त्यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. उषाताईंच्या कुटुंबियांच्या आणि ताराबाई व कुटुंबीयांच्या दुःखात समाजवादी प्रबोधिनी परिवार सहभागी आहे.उषाताई पत्की यांना भावपूर्ण आदरांजली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा