सांगली : लोक सध्या विविध चिंतांनी त्रस्त असले तरी सांगलीत एक सुलतान मात्र मजेत काजू-बदाम खातोय. हा सुलतान दुसरा तिसरा कोणी नसून दीड वर्षांचा एक बोकड आहे. मिरजेतील सोनू शेट्टी यांच्याकडे शेळ्या आहेत. शेळी पालनाचा त्यांचा व्यवसाय असून त्यांच्यापैकी एका शेळीने या सुलतानला जन्म दिला. त्याच्या कपाळावर चांद असल्यानं लवकरच तो चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे त्याच्या विक्रीसाठी 5 ते 6 लाख रुपये किंमत अपेक्षित होती. पण आता तीच किंमत थेट 20 ते 25 लाखांवर गेल्याचा दावा सोनू शेट्टी यांनी केला आहे
सुलतानची पंचक्रोशित चर्चा
सुलतान अनेक गोष्टींसाठी सध्या चर्चेला कारण ठरतोय. विशेष म्हणजे त्याचा आहार. तो आहारात काजू-बदाम खात असल्याने या बोकडाची पंचक्रोशित चर्चा आहे. या सुलतानला अगदी त्याच्या नावाप्रमाणेच वाढवलं जातंय. रोज एक माणूस त्याची आंघोळ आणि खाण्यापिण्यासाठी नेमलेला आहे. दीड ते दोन हजार रुपये असा त्याचा रोजचा खर्च आहे. सध्या त्याचं वजन 60 ते 70 किलोच्या दरम्यान आहे (Sangli goat worth rupees 25 lakh).
अपेक्षित किंमत येईपर्यंत विकणार नाही, सोनू शेट्टी ठाम
सुलतानला बघण्यासाठी आता वर्दळ वाढू लागली आहे. सध्या हा बोकड दीड वर्षांचा आहे. मुस्लिम समाजातील पवित्र सण मानल्या जाणाऱ्या बकरी ईदला डोक्यावर चांद असलेल्या बोकडाला विशेष मागणी असते. पण अद्यापही अपेक्षित किंमत येत नसल्याने सोनू शेट्टी यांनी बोकडाला विकलेले नाही. यावर्षी 21 जुलैला मुस्लिम समाजातील पवित्र सण बकरी ईद असून अपेक्षित किंमत येईपर्यंत बोकडाला विकणार नसल्याच सोनू शेट्टी यांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा