Breaking

गुरुवार, २२ जुलै, २०२१

पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल; NDRF च्या दोन तुकड्या जिल्ह्यातील या दोन ठिकाणी रवाना

संग्रहित


 कोल्हापूर : राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी 39.16" फूट झाली आहे. जिल्ह्यातील 105 बंधारे पाण्याखालील गेले आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी  आता इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जात आहे. जिल्ह्यात कालपासून अतिवृष्टी सुरू आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी चार वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल केली आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे. तसेच जिल्ह्यामध्ये सतर्कतेचा इशारा ही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.


NDRF टीम


      जिल्ह्यातील पूर स्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर आज एनडीआरएफच्या (NDRF) दोन तुकड्या कोल्हापूरमध्ये दाखल झाल्या आहेत. 25-25 स्वयंसेवकांच्या या दोन तुकड्यांपैकी एक तुकडी शिरोळ तालुक्यासाठी तर दुसरी तुकडी करवीर कोल्हापूर शहरासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शिरोळ  तालुक्यासाठी असणारे बदल सध्या शिरोळमध्ये दाखल झाले आहेत, तर उर्वरित एक पथक पर्याग चिखली याठिकाणी रवाना होत आहे. कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे एनडीआरएफ ने त्यांच्या नियोजनानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या आहेत.

     प्रशासनाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने विस्थापित होण्याची सूचना केल्यास तात्काळ स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होताना आवश्यक ती महत्वाची कागदपत्रे, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मौल्यवान वस्तू, औषधे, स्वतःचे साहित्य जसे साबण, ब्रश, पेस्ट, मोबाईल चार्जर, आवश्यक तेवढे कपडे, दोरी आदी साहित्य सोबत घ्यावे. घर सोडताना घरातील अवजड, किंमती साहित्य जसे सोफा, टिव्ही कपाटे इ. घरातील सर्वात उंच ठिकाणी ठेवावे. घरातील लाईटचा मेन स्विच, गॅस सिलेंडर बंद करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा