Breaking

मंगळवार, ६ जुलै, २०२१

गोकुळ' च्या शासन नियुक्त संचालक पदी शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांची निवड

 

मुरलीधर जाधव

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघ अर्थात 'गोकुळ'च्या स्वीकृत संचालकपदी मुरलीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. जाधव हे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख आहेत. या पदासाठी अनेकजण इच्छुक होते, पण शिवसेनेने कार्यकर्त्याला संधी देत वेगळा संदेश दिला आहे.


गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दोन महिन्यापूर्वी सत्तांतर झाले. पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाडिक गटाला धक्का देत सत्ता खेचून आणली. त्यानंतर आता शासन नियमानुसार स्वीकृत संचालक नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली. या पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने अनेकजण इच्छुक होते. निवडणुकीत पराभूत झालेल्या काहींनी मोठी फिल्डींग लावली होती. मात्र जाधव यांनी यामध्ये बाजी मारली.

जाधव हे गेले २० वर्षे शिवसेनेत सक्रिय आहेत. सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा प्रमुख अशा पदावर काम करताना हातकणंगले लोकसभा मतदार संघात पक्ष वाढीसाठी त्यांनी केलेल्या कामाचे बक्षीसच त्यांना मिळाले आहे. निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


दरम्यान, यंदा झालेल्या गोकुळच्या निवडणुकीत अनेक वर्षांनंतर सत्तांतर झालं. पाटील आणि मुश्रीफ यांनी विविध गटांची मोट बांधत महाडिकांच्या पॅनलचा धुव्वा उडवला. त्यामुळे आता गोकुळमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळताना पाहायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा