‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केलं आहे
पेगॅसस पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या अनेक सरकारी ग्राहकांनी सूचिबद्ध केलेल्या हजारो दूरध्वनी क्रमांकाच्या फुटलेल्या माहितीत ३०० हून अधिक भारतीय मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. हे मोबाइल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी वापरलेले आहेत, असे शोधपत्रकारितेच्या ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मधून उघड झालं आहे. यानिमित्ताने हे पेगॅसस म्हणजे नेमकं काय आहे आणि ते तुमचा मोबाइल कसं हॅक करु शकतं हे समजून घेवू.
पेगॅसस फोन हॅक कसं करतं ?
पेगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.
पेगॅसस काय करु शकतं ?
एकदा पेगॅससने तुमच्या मोबाइलमध्ये शिरकाव केला की ते सतत पाळत ठेवू शकतं. व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधून करण्यात आलेले चॅटही ते पाहू शकतात. सुरक्षा तज्ज्ञांनुसार, पेगॅसस मेसेज वाचू शकतं तसंत कॉलही ट्रॅक करु शकतं. याशिवाय अॅप्सचा वापर, त्यात होणाऱ्या घडामोडी, लोकेशन डेटा, व्हिडीओ कॅमेराचा ताबा मिळवणे, मायक्रोफोनच्या सहाय्याने संभाषण ऐकणं या गोष्टीही शक्य आहेत.
दहशतवादावर नियंत्रणासाठी वापर करत असल्याचा कंपनीचा दावा
हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे असा इस्त्राईलच्या कंपनीचा दावा आहे.
रिपोर्टनुसार, एकूण देशातील एकूण १० सरकारांनी पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस सॉफ्टवेअरचा पर्याय निवडला असून यामध्ये भारताचाही समावेश आहेत. भारत सरकारने गार्डियनशी बोलताना दावा चुकीचा आहे सांगितलं असलं तरी पेगॅससचा वापर करत असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे.
२०१६ मध्ये सर्वात प्रथम आलं समोर
पेगॅसस स्पायवेअरला इस्त्रायच्या सायबर सिक्युरिटी कंपनी एनएसओने तयार केलं आहे. या कंपनीची स्थापना २००८ साली झाली होती. २०१६ मध्ये सर्वात प्रथम हे सॉफ्टवेअर प्रकाशझोतात आलं होतं. एका अरब सामाजिक कार्यकर्त्याने संशयास्पद मेसेज आल्यानंतर संशय व्यक्त केला होता. पेगॅसस त्यावेळी आयफोन वापरकर्त्यांना टार्गेट करण्याचं प्रयत्न करत होतं अशी शंका होती. काही दिवसांनंतर अॅपलने आयओएसचं नवं व्हर्जन आणलं. यानंतर पेगॅसस सुरक्षेतील त्रुटीचा वापर करत हॅकिंग करत असल्याचं समोर आलं होतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा