Breaking

मंगळवार, २० जुलै, २०२१

बकरी ईद : ग्रामीण अर्थकारणाला उभारी देणार सण

 


__________________________________________________

प्रा. इम्रान मणेर


प्रा. इम्रान मणेर : लेखक व अर्थशास्त्र संशोधक

समन्वयक, एकलव्य करिअर अकॅडमी, जयसिंगपूर

E-mail : imranmaner@gmail.com

Mob : 9923292346


  वाचक मित्रहो, आजचा लिखाणाचा विषय थोडा वेगळा असून हे लिखाण जात व धर्म विरहीत असून कोणत्याही एका धर्माचे उदात्तीकरण करण्यासाठी नाही हे अगदी सुरुवातीस स्पष्ट सांगतो. या लेखाच्या माध्यमातून एका धार्मिक विधीचे तटस्थपणे ग्रामीण अर्थकारण  मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

   वाचक मित्रांनो मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमजान आणि बकरी ईद होय. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-अजहा, असेही संबोधले जाते. ईद-उल-फितर (रमजान) नंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे बकरी ईद होय. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी 'बकरी ईद' साजरी करण्यात येते. कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ईद-उल-अजहा याचा अर्थ त्यागाची ईद असा आहे. या दिवशी मुस्लिम बांधव व नातेवाईक एकत्र येऊन एकमेकांना भेटवस्तू व मिठाई देत असतात. इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बान करण्याची प्रथा आहे. बकरी ईद साजरी करण्यामागे इतिहास आणि काही मान्यता आहेत.

        आपण बकरी ईदच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या आर्थिक उलाढालीचे सविस्तर अर्थकारण पाहणार आहोत.

भारतात सन २०१८ मध्ये जवळपास २० कोटी लोकसंख्या ही मुस्लिम बांधवांची होती. हे सर्व मुस्लिम बांधव ईद-उल-अजहा (बकरी ईद) साजरी करतात, मात्र सर्वजण कुर्बानी करतातच असे नाही. किमान २०% मुस्लिम लोक कुर्बानी करतात असे गृहीत धरून त्याचे अर्थकारण मांडले असता असे दिसते की, किमान ४,००,००,००० (४ कोटी) लोकसंख्या कुर्बानी करीत असतील असे गृहीत धरून एका कुटुंबामध्ये ७ व्यक्ती असे गृहीत मानल्यास जवळपास ५७,१४,२८५ (५७ लाख) कुटुंबे कुर्बानी करतील असा अंदाज आहे. यासाठी लागणारे बोकड/मेंढी याचे वय किमान १५ महिने (सव्वा वर्ष) असावे लागते. त्यानुसार आज बोकड/ मेंढी याची किंमत सुमारे ₹ २०,००० ते ₹ ३०,००० इतकी आहे. 

   ५७ लाख कुटुंबे × २५,००० ₹ प्रति बोकड/मेंढी = १४,२५० कोटी ₹. आहे.आता हे पहा की, हे उत्पादन  चिनी व  बहुराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन नसून हे १००% देशी ग्रामीण उत्पादन आहे. या उत्पादनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध ग्रामीण अर्थव्यवस्थेशी असून शेती, शेतकरी व छोटे व्यावसायिक हे या गटात केंद्रबिंदू आहे.याचे अर्थकारण पाहताना हे लक्षात येते की, जर एखादा शेतकरी वर्षाला साधारणतः १० शेळी व्यवस्थापित पालन करतो तर ५७,००,००० ÷ १० = ५ लाख ७० हजार कुटुंबाला रोजगार मिळतो. याचाच अर्थ, बकरी ईदचे स्थानिक व्यवसायात १४,२५० कोटी रुपयांचे योगदान आहे आणि सुमारे ५ लाख ७० हजार शेतकरी कुटुंबाना रोजगार उपलब्ध होतो.

       शेती हा व्यवसाय धर्मावर आधारित नसून विविध समाजातील सर्वच शेतकर्‍यांना त्याचा फायदा होतो. तसेच प्रत्येक बकरीचे मांस गरीब मुस्लिम बांधवांना वाटले जाते आणि किमान ४५ लोक एका बकरीचे मांस खातात, यावरून असे म्हणता येईल की, बकरी ईद ५७ लाख × ४५ लोक = २५ कोटी लोकांना मोफत अन्न पुरवते.

👉🏼 बकरी ईदचे मुख्य आर्थिक फायदेः

व्यवसाय - ₹ १४,२५० कोटी,

विनामूल्य अन्न - २५ कोटी लोक,

रोजगार - ५ लाख ७० हजार कुटुंबे व

(खाटीक, वाहतूक खर्च, पॅकिंग हे घटक वेगळे आहेत. यात त्याचा खर्च धरलेला नाही. शिवाय चामडी उद्योग, एक्स्पोर्ट व  अन्य क्षेत्र हे अजून वेगळे अर्थकारण आहे. लेदर शूज, लेदर बेल्ट, लेदर बॅग, वाद्ये जसे तबला, ढोल, ताशा बनवण्याच्या इंडस्ट्रीज यांचा यात समावेश नाही.) हे अगदी किमान अंदाज आहेत, वास्तविक वरीलपेक्षा दुप्पट असू शकते.

      पशुधन जनावरे ही ग्रामीण भारतातील सर्वात द्रव संपत्तीअसून शासनाने वेळोवेळी रोजगार वाढविण्यासाठी व त्याच्या व्यापारास चालना दिली आहे. देशातील जीडीपी आणि रोजगार वाढीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारा हा एक सण आहे.

" बकरी ईद हा सण प्रत्यक्षपणे ग्रामीण  व्यवसाय व रोजगार या माध्यमातून अर्थव्यवस्थेचे चक्र फुलविणारा आहे. तसेच अप्रत्यक्षपणे शहरी अर्थव्यवस्थेला सहाय्यभूत ठरणारा आहे. राज्य व केंद्र सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थसहाय्य व सहकार्य करणे आवश्यक आहे.

    सदरची माहिती फक्त ईदच्या दिवशीची आहे, बकरी ईदच्या निमित्ताने  इतर ३६४ दिवस ग्रामीण अर्थव्यवस्थेला अशीच उभारी मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था सुजलाम-सुफलाम होऊ शकते या यानिमित्ताने अधोरेखित होते. तसेच या देशातील प्रत्येक धर्मीयांचा सण हा या देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारे आहेत हे  देखील या निमित्ताने स्पष्ट होते. त्यामुळे या घटकाकडे आपण सकारात्मक व डोळसपणे पाहू या.

      महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामीण भारत आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवायचा असेल तर  ग्रामीण विकास अर्थात अर्थव्यवस्थारुपी गाव गाडा अशा प्रकारच्या व इतर सणाच्या माध्यमातून ही अर्थक्षम करता येतो हे अगदी स्पष्ट होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा