Breaking

मंगळवार, १३ जुलै, २०२१

३१ डिसेंबरपूर्वी राज्यभरात ५ हजार जागांची पोलिस भरती : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील



औरंगाबाद: येत्या ३१ डिसेंबरपूर्वी राज्यभरात ५ हजार जागांची पोलिस भरती झालेली असेल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (ता.१२) औरंगाबादेत दिली. शहर पोलिस दल तसेच औरंगाबाद परिक्षेत्राच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पदभरतीनंतरही ७ हजार पोलिसांची पुन्हा नव्याने भरती करणार असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान दाखल काही गुन्हे मागे घेतलेले आहेत. आता उर्वरित गुन्हेही मागे घेतले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.


मंत्री वळसे पाटील यांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्था, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, तसेच दाखल झाल्यानंतर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण आदींचा आढावा घेतला.

  वाझे प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी वनमंत्री संजय राठोड आदि प्रकरणानंतर पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे का, यावर बोलताना सर्वसामान्य माणसाला पोलिस ठाण्यात आदराची वागणूक मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, तशा सक्त सूचनाही संबंधितांना दिल्याचे मंत्री वळसेपाटील म्हणाले. यावेळी पोलिस महांचालक संजय पांडे, आयुक्त डॉ. निखील गुप्ता, आयजी एम. प्रसन्ना, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह औरंगाबाद परिक्षेत्रातील संबंधित जिल्ह्याचे अधीक्षक, आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

      आर्थिक, सायबर गुन्ह्यात वाढ-

आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून प्रभावी काम करण्याची गरज मंत्र्यांनी व्यक्त केली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून महिलांची बदनामी होत आहे. दोन समाजात तेढ निर्माण होणे, गावात संघर्ष निर्माण होण्यासारख्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी ग्रामीण पोलिसांनी भर दिल्याने मंत्र्यांनी कौतुकही केले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या (कोरोना योद्धा) अनुकंपा भरतीबद्दल सरकारचे धोरण सुस्पष्ट असून हा निर्णय आयुक्त स्तरावर, पोलिस अधीक्षक स्तरावर होईल. या कोरोना योध्यांच्या वारसांना ५० लाख रुपये दिले असून प्रलंबित प्रस्तावही लवकरच मार्गी लावण्यात येतील, असेही मंत्री वळसे पाटील म्हणाले. दरम्यान, शहरातील रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीचा आयुक्तालयातील नियंत्रण विभाग पाहिल्यानंतर एखादा रस्ता झुम करुन दाखवा अशा सुचना गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या असता पोलिसांनी शहरातील रस्त्यावरील सीसीटीव्ही झुम करुन दाखविला. पोलिसांना चांगले कार्यालय, घर मिळावे यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा