रूकडी: कोणत्याही पदासाठी मुलाखत देताना आत्मविश्वासाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, या
पदासाठी माझी निवड होईल की नाही हे विचार मनात आणू नका, मनावर कोणतेही दडपण आणू नका, प्रसन्न व हसतमुखाने मुलाखतीला सामोरे जा यश तुमचेच असेल असे मत श्री. विनोदकुमार प्रधान यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या मुलाखत तंत्र या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले.मा.प्रधान यांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी तयारी कशी असावी, मानसिक स्थिती काय असावी, प्रत्यक्ष मुलाखत देताना आपण कशा प्रकारे सामोरे गेले पाहिजे आणि मुलाखत देऊन आल्यानंतर आपले वर्तन कसे असावे याबाबत सखोल माहिती स्लाईड शो व व्हिडिओच्या माध्यमातून दिली.
दुसऱ्या सत्रात विविध पदासाठी मुलाखत घेणाऱ्या श्रीमती संध्या कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. श्रीमती कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाल्या की,आज एक जागा भरावयाची असेल तर हजारो उमेदवार त्या जागेसाठी अर्ज करतात. प्रत्येकाला वाटते की या जागेवर माझी निवड होईल परंतु मुलाखतकार उमेदवाराची निवड करताना हा उमेदवार या जागेसाठी योग्य आहे का नाही ते विविध पद्धतीने उमेदवाराची चाचपणी करून निवड करतात. यामध्ये प्रामुख्याने हा उमेदवार सर्वांना बरोबर घेऊन काम करू शकेल का ? दिलेले काम वेळेत पूर्ण करेल का ? कामामध्ये टाळाटाळ करणार नाही ना ? अशा विविध गोष्टींची चाचपणी मुलाखत घेणारे करीत असतात. आपल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच आपल्याकडे असलेल्या वर्तन कौशल्याचेही निरीक्षण करीत असतात त्यामुळे आपले वर्तन कौशल्य सुद्धा महत्वाचे आहे.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे म्हणाले अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करून आपण इथंपर्यंत आलेलो असतो, मुलाखत हा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असून मुलाखत हा चाळणीचा टप्पा असतो. या चाळणीमधून आपणाला पुढे जावे लागते आणि आपण ज्या पदासाठी मुलाखत देणार आहोत.त्या जागेसाठीच्या मुलाखतीत यशस्वी होऊन संबंधित जागेवर आपली निवड होऊन काम करणार असतो पण या मुलाखतीत आणि त्या पदासाठी पात्र होण्यासाठी मुलाखत घेणारे आपली निवड करताना विविध अंगाने आपली पडताळणी करतात, त्यामुळे उमेदवाराने मुलाखतीला जाताना पूर्ण आत्मविश्वासाने जाणे आवश्यक असते.
ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक तसेच श्री.विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय पेठवडगाव, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या द्वितीय सत्रातील प्रास्ताविक डॉ. उत्तम पाटील यांनी केले. उत्तम आभार डॉ.अशोक पाटील यांनी मानले तर सुसंगत व मधुर सूत्रसंचालन डॉ. माधवी सोळांकूरकर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा