मुंबई : कोरोनामुळे अनेकांचं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे. यातच कोरोनाच्या महामारीमुळे शालेय जीवनावरही प्रभाव पडलेला आहे. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्यानं अनेक विद्यार्थ्यांना शाळेची फी भरण्यास देखील अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर होली स्टार इंग्रजी शाळेच्या तरुण मालकांनी 65 टक्के विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभराची फी माफ केली असल्याची कौतुकास्पद बातमी समोर येत आहे.
कोरोनाच्या या संकट काळात एकीकडे खाजगी शाळांकडून एक रुपया सुद्धा फी माफ केली जात नसताना मालाड-मालवणी भागातील होली स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक आणि मालक 35 वर्षीय हुसैन शेख यांनी आपल्या 1500 विद्यार्थ्यांपैकी 1000 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शाळेची फी माफ केली आहे.
फीच्या कारणामुळे मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी हुसैन यांनी शिक्षकांशी चर्चा केली व गरजू विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ करण्याचा निर्णय घेतला.याशिवाय उरलेले 500 विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कमीत कमी 15 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. सोबतच गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांना रेशन किट देखील दिलं जात आहे.
दरम्यान, हुसैन शेख यांनी विद्यार्थ्यांकडून फी घेतली नसल्यामुळे शाळेतील शिक्षिकांना पगार देणे आणि स्वत:चं घर चालविण्यासाठी बायकोचे दागिने बँकेत गहाण ठेवले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शिक्षक देखील अर्ध्या पगारात काम करण्यास तयार झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा