Breaking

सोमवार, २६ जुलै, २०२१

शिरोळ तालुक्यात महापूराची परिस्थिती भयानक ; नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली




प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


     शिरोळ तालुक्यात पाऊसमान कमी असलं तरी कृष्णा व पंचगंगा पाण्यामुळे महापूराची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.शिरोळ मध्ये कृष्णा, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असून कृष्णा, वारणा व पंचगंगा या प्रमुख नद्यांवरील धरणांतून पाणी विसर्ग कमी करण्यात आला आहे. तरी देखील शिरोळ तालुक्यात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांची पाणीपातळीत अनिश्चित वाढ होत आहे.

    पंचगंगा (75 फूट) व कृष्णा (60.3 फूट) नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. याशिवाय नृसिंहवाडी-शिरोळ मार्गावर चार फूट पाणी आल्याने मार्ग बंद झाला आहे.

स्थलांतरित कुटुंबासाठी गुरुदत्त साखर कारखाना, दत्त साखर कारखाना, पद्माराजे विद्यालय या ठिकाणी शासकीय निवारा छावण्या उभा करण्यात आल्या आहेत. बहुतांशी नागरिकांनी खासगी भाड्याच्या खोलीत स्थलांतर केले.

    ही आकडेवारी सुमारे 45 हजारच्या आसपास असल्याचे शिरोळ आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने सांगितले आहे. तसेच शिरोळ मधील काळे मळा, पाटील मळा, जनता हायस्कूल, राजाराम शाळा, शाहूनगर, मांगारूडी वसाहत, शिरटी रोडवरील मळा वस्ती भाग, जय शिवराय मंडळ, अजिंक्यतारा मंडळ, धनगर गल्ली, धरणगुत्ती रोडवरील नागरी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने 900 कुटुंबे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहे. 12 तासांत अनुक्रमे राजापूर 6, शिरोळ 12.1, तेरवाड 9.6, नृसिंहवाडीत 12.9 फुटांनी वाढ झाली आहे.तज्ञ व जाणकारांच्या मते शिरोळमध्ये निर्माण झालेली महापुराची परिस्थिती हिप्परगी व अलमट्टीमुले झाली आहे. 

    प्रमुख चार नद्यांच्या धरणांतून सध्या जेमतेम पाणी विसर्ग सुरू असून सलग तीन दिवस पाऊस नसतानासुद्धा पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. राजापूर बंधार्‍यावरून कर्नाटकात होणारा 3 लाख 16 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि हिप्परगी बरोबर अलमट्टीतुन होत असलेला विसर्ग यात खूपच फरक असल्याने, शिरोळ मधील नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

      यामुळे शासनाने व प्रशासनाने कंबर कसून काम केलं पाहिजे त्याचबरोबर नागरिकांनीही स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवून महापुराची परिस्थिती हाताळली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा