Breaking

शुक्रवार, ९ जुलै, २०२१

"शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत ‘टॉप-१५०’मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले"



प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


    कोल्हापूर, दि. ९ जुलै: फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक तथा प्र-कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत ‘टॉप-१५०’मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर लेखन देशात सर्वाधिक वाचले गेले आहे. त्यांच्या संशोधनाला ३७०८ इतक्या व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. 

    नुकत्याच जाहीर झालेल्या ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा- २०१६-२०२१’मधून त्यांचे हे स्थान अधोरेखित झाले आहे.

   डॉ. पी.एस. पाटील यांची मटेरिअल सायन्स, नॅनोसायन्स, फोटोकॅटॅलिसिस, सोलर सेल डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांतील संशोधनासाठी जगभरातील आघाडीच्या संशोधकांमध्ये गणना केली जाते. काही काळापूर्वीच जाहीर झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या २ टक्के संशोधकांमध्येही त्यांचे नाव आघाडीवर होतेच. त्याचप्रमाणे ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्येही डॉ. पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते. नुकताच सन २०१६ ते २०२१ या कालावधीतील ‘स्कोपस’ डाटाच्या आधारे केवळ फोटोकॅटॅलिसिस व सोलर सेल क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या ५०० संशोधकांचा समावेश असणारा ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा’ जाहीर करण्यात आला. या यादीमध्ये डॉ. पी.एस. पाटील हे १४७व्या स्थानी आहेत. त्यांच्यावर १३१व्या स्थानी ओडिशा येथील आय.टी.ई.आर. शिक्षा ‘ओ’ अनुसंधान या संस्थेचे डॉ. के.एम. परिदा हे आहेत. भारतीय संशोधकांच्या यादीत डॉ. पारिदा हे प्रथम स्थानी तर डॉ. पाटील हे द्वितिय स्थानी आहेत.

      भारतीय संशोधकांच्या ‘टॉप-५००’च्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठातील अन्य सात संशोधकांनाही स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये डॉ. व्ही.एल. पाटील, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. के.एम. गरडकर, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए.जी. दोड्डमणी, डॉ. ए.व्ही. मोहोळकर आणि डॉ. एन.एल. तरवाळ यांचा समावेश आहे.

        सदर यादी सन २०१६ ते २०२१ या कालावधीतील ‘स्कोपस’ डाटाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या विज्ञानपत्रिकांमधून प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचा आधार घेण्यात आला असून स्कॉलरली आऊटपुट, व्ह्यूज काऊंट, फिल्ड-वेटेड सायटेशन इम्पॅक्ट आणि सायटेशन काऊंट आदींच्या आधारे क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. पी.एस. पाटील यांचा स्कॉलरली आऊटपुट ८३ असून त्यांच्या संशोधनाला देशात सर्वाधिक ३७०८ व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. त्यांचा फिल्ड-वेटेड सायटेशन इम्पॅक्ट १.९१ इतका असून सायटेशन काऊंट १७२६ इतका आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत शिवाजी विद्यापीठ हे फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट या क्षेत्रांमध्ये भरीव संशोधन करीत आहे. या संशोधन क्षेत्रात आपण सातत्याने आघाडी टिकवून आहोत. गेल्या पाच वर्षांतील वाटचालही त्याला अपवाद नाही. त्याचेच हे फलित आहे. या पुढील काळातही व्यक्तीगत स्तरावर तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संशोधन परंपरा अखंडित पुढे चालवित राहणे महत्त्वाचे आहे. केवळ विद्यापीठातीलच नव्हे, तर जगभरात पसरलेले शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी सुद्धा संशोधनाच्या विविध क्षेत्रांत योगदान देत आहेत, हेही आपण लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.


विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

              कुलगुरू Prof. D.T. Shirke

     या क्रमवारीची माहिती समजल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले की, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची संशोधन क्षेत्रातील कामगिरी ही सातत्याने चमकदार राहिली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य हे अभिनंदनीय स्वरुपाचे आहेच. त्यांच्या बरोबरीने विद्यापीठाच्या अन्य सात संशोधकांनीही देशातल्या आघाडीच्या ५०० संशोधकांत स्थान मिळविले, यातूनही विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा सिद्ध होतो. त्यांची कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे. या संशोधकांसह समस्त संशोधक, विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधकीय कारकीर्दीत सातत्य राखून असे अनेक मानसन्मान प्राप्त करावेत, आपले स्थान उंचावत राहावे. त्यासाठी विद्यापीठ त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

   काय आहे ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा’?

'एल्सव्हिअर-सायव्हॅल’ ही वेब-बेस्ड संशोधन विश्लेषण प्रणाली असून २३० देशांतील सुमारे २० हजार शैक्षणिक व संशोधन संस्था आणि तेथे कार्यरत असणारे संशोधक यांच्या संशोधनकार्याचा लेखाजोखा या प्रणालीद्वारे मांडला जातो. संशोधकाचा संशोधन प्रवास, संशोधनातील प्रवाह, नवसंशोधनाची त्यांची सांगड अशा अनेक अभिनव पद्धतीने हे विश्लेषण केले जाते. संशोधकांना वेळोवेळी ते पुरविले जाते. त्यासाठी जगातल्या पाच हजारांहून अधिक प्रकाशनांच्या २२ हजारांहून अधिक संशोधन पत्रिकांचे विश्लेषण सातत्याने केले जात असते. अशा सुमारे ५५ दशलक्ष प्रकाशित संशोधनांचा डाटा सायव्हॅलकडे आहे. ३०० ट्रिलियन मॅट्रिक व्हॅल्यूच्या आधारे तत्काळ विश्लेषण करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

1 टिप्पणी: