Breaking

गुरुवार, १५ जुलै, २०२१

कुरुंदवाड नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

 



मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


शिरोळ : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, कुरुंदवाड येथील नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. त्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले.

    येथील अमन हॉलमध्ये शिव संपर्क अभियान अंतर्गत प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पाटील होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करते. अनेक संघटना, पक्ष धुळीस मिळाले.

     मात्र, शिवसेनेत जन्मलेला शिवसैनिक कोणत्याही पदाची अपेक्षा न करता सर्वसामान्यांसाठी झटतो. म्हणूनच शिवसेना राज्यात नेतृत्व करीत आहे. शिवसेनेतील नेत्यांना मिळालेली पदे म्हणजेच शिवसैनिकांचा सन्मान आहे.

  अध्यक्षपदावरून बोलताना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय घराघरात पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांनी ताकतीने कामाला लागले पाहिजे.

      प्रारंभी स्वागत शिरोळ तालुका शिवसेनाप्रमुख वैभव उगळे यांनी तर प्रास्ताविक जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील यांनी केले. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची शासन नियुक्त कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघावर संचालक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल उल्हास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    यावेळी राजेंद्र सुतार, जिल्हा महिला संघटिका मंगल चव्हाण, महिला शहर प्रमुख वैशाली जुगळे, अण्णासाहेब बिलोरे, रामभाऊ माळी, पिंटू नरके, राजेंद्र बेले, रेखा जाधव, चंद्रकांत मोरे या मान्यवरांसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार शहर शिवसेना प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा