हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
१) पुणे-बंगळूर महामार्गावर अद्याप चार फूट पाणी*
▪️कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे शुक्रवारी बंद झालेला पुणे- बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी ओसरत असली तरी पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद आहे.शुक्रवारी दुपारी पाणी पातळी वेगाने वाढत गेल्याने महामार्ग बंद झाला होता. मध्यरात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने सध्या पाणी केवळ पाच इंच ओसरले आहे.पाण्याची पातळी अजून दोन फुटांनी कमी झाल्यास वाहतूक सुरु होऊ शकते.शुक्रवारी सकाळी यमगर्णी येथे वेदगंगा नदीचे पाणी आल्याने कागल ते निपाणी दरम्यानचा महामार्ग बंद झाला होता. दुपारनंतर शिरोलीजवळील महामार्ग बंद झाला होता.
*२) 👉महापुराचा गोकुळला जबर फटका, पुरवठा ठप्प*
▪️कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे जिल्ह्यातील सर्व मार्ग बंद झाले आहेत. यामुळे गोकुळ दुध संघाला याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील बहुतेक गावांचा संपर्क तुटल्याने Gokul milk संघाची वाहने अडकून पडल्याने लाखो लिटर दुधाचा पुरवठा ठप्प झाला आहे.मागील दोन दिवसांत अनेक मार्गावरील दूध संकलनाची वाहने जाऊ शकली नाहीत. त्यामुळे दोन दिवसांत २ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक दूध संकलन होऊ शकले नाही.यामुळे दूध उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
*३) कोयना धरण : दरवाजे १२ फुटांवर; ५३,३६० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग*
▪️कोयना धरणाचे दरवाजे १२ फुटांवर उचलण्यात आले आहेत. कोयना धरणांतर्गत विभागात सुरू असलेला विक्रमी पाऊस व त्याच पटीत होत असलेली विक्रमी पाण्याची आवक लक्षात घेता शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे 10 फुटांवरून 12 फूट उचलण्यात आले आहेत.या 6 वक्री दरवाजातून विनावापर 51,260 क्युसेक्स व कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 2100 क्युसेक्स असे प्रतिसेकंद 53,360 क्युसेक्स पाणी सध्या पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 84,878 क्युसेक्स इतक्या पाण्याची आवक होत आहे.
---------------------
*४) शिवाजी विद्यापीठ पुरविणार शहराला पाणी; जनावरांना चारा*
▪️महापुराच्या संकटात शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने उचलली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ परिसरातील चारा शहरातील जनावरांना पुरविला जाणार आहे.जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शहर व परिसरात निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीत विद्यापीठाने महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून शहर व परिसराला पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी उचलली आहे.कोल्हापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणारे महानगरपालिकेचे सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प शुक्रवारी पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.हा प्रश्न उद्भवल्याचे लक्षात येताच कालपासूनच शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने आपल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे शहराला पाणी पुरविण्याची तयारी केली.
*५) शिरोळ तालुक्यात पुरस्थिती गंभीर, नागरिकांचे स्थलांतर सुरूच*
▪️कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील बहुतेक गावामध्ये पुराचे पाणी आल्याने स्थलांतर करण्यास सुरूवात केली. शिरोळ तालुक्यातील मुख्य असलेल्या कुरूंदवाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, शिकलगार वाडा, मसवड रस्ता, गोठणपूर, कोरवी गल्ली, परिसरात महापुराचे पाणी आल्याने ८० टक्क्यांहून अधिक नागरिक जनावरांसह स्थलांतर झाले आहेत.दरम्यान मजरेवाडी, टाकळीवाडी, गणेशवाडी, कनवाड, हेरवाड, शिरोळ, नांदणी यामार्गावर पाणी आले आहे. शिरोळ तालुक्यातील मुख्य जिल्हा मार्ग बंद झाल्याने दळणवळण ठप्प झाले आहे.टाकळीवाडी (ता.शिरोळ) येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, बस्तवाड, चिंचवड व कुरुंदवाड शहरातील ९८० नागरिक व ६८० जनावरे स्थलांतरित झाली आहेत.साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने दोन वेळचे जेवण नाष्टा व लहान मुलांसाठी दुधाची सोय केली आहे. कारखानास्थळावर एनडीआरएफचे जवान दाखल झाले आहेत.
६) कोल्हापूर - पुरामुळे शहरात पाणीटंचाई; वॉटर ATM समोर नागरिकांची गर्दी*
▪️शहरातील पुरस्थितीमुळे निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे पिण्यासाठीच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी शहरात आणि उपनगरमध्ये अनेक ठिकाणी कार्यरत असणाऱ्या वॉटर एटीएमवर नागरिकांनी गर्दी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीवरील पाणी उपसा केंद्र पुराच्या पाण्यामध्ये गेली आहेत. परिणामी शहरातील व उपनगरातील पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
७) महाराष्ट्रानंतर गोव्यात पावसाचे तांडव; नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरं पाण्याखाली*
▪️शुक्रवारी गोव्यात मुसळधार पाऊस आणि दशकांतील भीषण पुरामुळे रस्ते आणि पुल तुटून पडले आहेत, घरांचे आणि मालमत्तांचे कोट्यावधी नुकसान झाले आणि ४०० पेक्षा जास्त लोकांना तेथून हलवण्यास भाग पडले. दरड कोसळल्यामुळे आणि नदीला पूर आल्याने दोन रेल्वे गाड्याही रुळावरुन घसरल्या आहेत. उत्तर गोव्यातील सत्तारी आणि बिचोलिम आणि दक्षिण भागातील धारबंदोरासहित काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसानंतर नद्यांमधील पाण्याचा स्तर वाढल्याने अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत. मात्र अद्याप कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
---------------------
Chan mahiti मिळाली धन्यवाद.
उत्तर द्याहटवा