भारतीय सीमा रस्ते संघटनेने (BRO) अथक प्रयत्न करून जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता बांधला आहे. हा 52 किमीचा रस्ता बांधतानाच एवढा कठीण आहे, की एवढ्या खडतर रस्त्यावरून वाहने चालविताना ड्रायव्हरचाही कस लागणार आहे.
सीमा रस्ते संघटना ( Border Roads Organisation) ही संघटना भारत सरकारची आहे. सीमाभागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम ही एजन्सी करते. बीआरओ ही भारतीय लष्कराची संघटना आहे. लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी रस्ते बनविले जातात. जगातील सर्वात उंचीवरचा रस्ता बनविण्याचे रेकॉर्ड आता भारताच्या नावावर होणार आहे. पूर्व लड्डाखमध्ये उमलिंग ला पासवर 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. अतिशय निमुळते पर्वत, डोंगररांगा पार करत बीआरओने 52 किमीचा हा पक्का रस्ता बनविला आहे. हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो.
याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हियामध्ये होता. त्याची उंची 18,953 फूट आहे. हा उटुरुंकु नावाच्या ज्वालामुखीपर्यंत जात होता. माऊंट एव्हरेस्टचे जे बेस कॅम्प आहेत ते देखील या रस्त्याच्या उंचीपेक्षा कमी उंचीवर आहेत.
संरक्षण मंत्रालयानुसार येथील तापमान हे थंडीत उणे 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरते. तसेच येथील ऑक्सिजन हा 50 टक्के कमी असतो. यामुळे येथे अधिक काळ राहणे कठीण असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा